मी सुन्न झाले..; रणदीप हुडाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाविषयी सुप्रिया पिळगावकर यांची पोस्ट चर्चेत
रणदीप हुडाची मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. देशभरातील विविध थिएटर्समध्ये अधिकाधिक वितरण न झाल्याने या चित्रपटाचे शोज मुख्य शहरांमध्ये फार कमी आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला आहे. मात्र ज्या प्रेक्षकांनी किंवा सेलिब्रिटींनी हा चित्रपट पाहिला, त्यांनी सोशल मीडियावर आवर्जून पोस्ट लिहिली आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता सौरभ गोखले यांच्यानंतर आता अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लहानपणीची एक आठवणसुद्धा सांगितली आहे. त्याचप्रमाणे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट बघण्याची हिंंमत तुम्ही दाखवणार का, असा सवालही त्यांनी नेटकऱ्यांना केला आहे.
सुप्रिया पिळगावकर यांची पोस्ट-
‘मी 12 वर्षांची असताना माझ्या वडिलांनी मला शाळेच्या सुट्टीत वाचण्यासाठी एक पुस्तक दिलं होतं. ते पुस्तक जाडजूड होतं. सुट्टी संपेपर्यंत मी ते पुस्तक वाचून काढणं अपेक्षित होतं. मी ते वाचायला सुरुवात केली आणि वाचून पूर्ण होईपर्यंत ते पुस्तक खाली ठेवू शकले नाही. सुरुवातीला या वाचनात अनेकदा व्यत्यय आला कारण मी रडले, दु:खी झाले आणि पुस्तक अर्ध वाचून होईपर्यंत माझं मन सुन्न झालं होतं. हेच पुस्तक आता चित्रपटाच्या रुपात जिवंत झालंय. ‘माझी जन्मठेप’ असं पुस्तकाचं नाव आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे चित्रपटाचं नाव आहे. तुम्ही हा चित्रपट बघण्याची हिंमत दाखवणार का,’ असं त्यांनी लिहिलं आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात 1897 ते 1950 या दरम्यानच्या काळातील कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये रणदीपसोबतच अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रणदीपने या चित्रपटात केवळ मुख्य भूमिका साकारलीच नाही, तर त्याने दिग्दर्शनसुद्धा केलंय. या चित्रपटाच्या निमित्ताने रणदीपने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलंय. आधी महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. मात्र शूटिंगदरम्यान काही मतभेद निर्माण झाल्याने त्यांना माघार घेतली आणि त्यानंतर रणदीपने दिग्दर्शन केलं. गेल्या सात दिवसांत या चित्रपटाने जवळपास 11 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाचा बजेट 20 कोटी रुपये असल्याचं समजतंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List