गुन्हा नोंदवित असतानाच आरोपी जाळ्य़ात; वडूज पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
कातरखटाव गावातील वृद्धेच्या घरी चोरी झाल्याची तक्रार वृद्धेची सून पोलिसांकडे करीत असताना वडूज पोलिसांनी काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळत मुद्देमाल जप्त केला. वडूज पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त होत आहे.
कातरखटाव येथे बोडके मळ्यात राहणाऱया एका वृद्धेच्या घरातून तीन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरीस गेला होता. वृद्ध महिलेने सून जयश्री यांना फोन करून त्यांना माहिती दिली. त्यानंतर जयश्री या मुंबईहून गावी आल्या. घरी आल्यानंतर त्यांनी कपाटात पाहणी केली असता, सोन्याच्या दोन बांगडय़ा, सोन्याचे नाणे, सहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यानंतर वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे आणि शिवाजी खाडे यांनी या गुह्याचा तपास करत असताना, तक्रारदार महिलेने सांगितलेल्या माहितीनुसार काही तासांतच आरोपीची माहिती मिळविली. मात्र, संशयित वडूजकडे आला असल्याची खबर मिळाली. त्यावरून त्यांनी सापळा रचून संशयिताच्या अवघ्या काही तासांतच मुसक्या आवळल्या. तपासादरम्यान आरोपीने गुह्याची कबुली दिली. तसेच, त्याची झडती घेताना चोरीस गेलेला मुद्देमाल त्याच्याकडे आढळून आला. वडूज पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List