मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे 2 चिमुकल्यांचा मृत्यू; एक डोसनंतर डॉक्टरही बेशुद्ध, पालकांमध्ये भीतीचं वातावरण
मध्य प्रदेशमधील छिंदवारा येथे कफ सिरपमुळं 6 चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला 24 तास होत नाही तोच अशीच घटना राजस्थानमध्येही घडली आहे. राजस्थानमधील एका कंपनीने बनवलेल्या जेनेरीक कफ सिरपमुळे दोन बालकांचा मृत्यू झाला असून 10 जण आजारी पडले आहेत. विशेष म्हणजे हे कफ सिरप सुरक्षित असल्याचे म्हणत याचा एक डोस घेणारा डॉक्टरही बेशुद्ध पडला. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कफ सिरप घेतल्यामुळे दोन आठवड्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून 10 जण आजारी पडले आहेत. ज्या डॉक्टरने हे कफ सिरप सुरक्षित असल्याचे दाखवण्यासाठी डोस घेतला तो देखील बेशुद्ध पडला आणि आठ तासानंतर त्याच्या कारमध्ये सापडला.
केसन फार्मा नावाच्या कंपनीने बनवलेले हे ‘डेक्स्ट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड’ कफ सिरप घेतल्यामुळे सोमवारी 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. सिकर जिल्ह्यातील नितीश (वय – 5) याला सर्दी-खोकला झाल्याने त्याचे पालक त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी लिहून दिलेले कफ सिरप नितीशच्या आईने त्याला रात्री साडे अकराच्या सुमारास दिले. त्यानंतर पहाटे तीन वाजता उचकी लागल्याने नितीशला जाग आली. त्यानंतर आईने उठून त्याला पाणी दिले आणि नितीश पुन्हा झोपी गेला तो उठलाच नाही. सकाळी पालकांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तत्पूर्वी 22 सप्टेंबर रोजीही अशीच घटना घडली होती. भरतपूर येथील मल्हा गावात सम्राट, त्याची बहीण साक्षी आणि त्याचा चुलत भाऊ विराट यांना सर्दी-खोकला झाला होता. त्यानंतर त्यांना केसन फार्माने बनवलेले कफ सिरप देण्यात आले. यानंतर तिघेही झोपी गेले आणि उठलेत नाही. कुटुंबीय काळजीत पडले आणि त्यांनी तिघांनाही उठवण्याचा प्रयत्न केला. साक्षी आणि विराट जागे झाले आणि त्यानंतर दोघांनाही उलट्या झाल्या, पण सम्राट शुद्धित आला नाही. त्याला जयपूरच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List