पाऊस पडल्यानंतर तुम्हाला दारू पिण्याची इच्छा होते का? काय आहे यामागील कारण? वाचा…
राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुर आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पावसाचे वातावरण तयार झाल्यावर किंवा पाऊस पडल्यावर अनेकांना गरमागरम भजी खाण्याची आणि चहा पिण्याची इच्छा होते. मात्र काही लोकांना दारू पिण्याचीही इच्छा होते. अशी इच्छा तुम्हालाही होत असेल तर ही सामान्य बाब आहे. मात्र भजी खाण्याची आणि दारू पिण्याची इच्छा का होते? .यामागे नेमकं काय वैज्ञानिक कारण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात हवामान थंड होते, याचा परिणाम आपल्या मूडवर देखील होतो. पावसाळ्यात अनेकदा कमी सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे शरीरात सेरोटोनिनची पातळी कमी होते. सेरोटोनिन हे असे न्यूरोट्रांसमीटर आहे, ज्यामुळे मूडवर परिणाम होते. ज्यावळी शरिरात सेरोटोनिनची पातळी कमी होते, त्यावेळी लोक मूड सुधारण्यासाठी इतर मार्गांचा वापर करतात. यात अल्कोहोल, चहा, भजी किंवा इतर पदार्थांचा समावेश आहे. अल्कोहोल पिल्यान शरीरात डोपामाइन आणि एंडोर्फिनचे प्रमाण वाढते, त्यामुळे काही काळासाठी मूड सुधारतो. त्यामुळे जे लोक दारू पितात, त्यांना पावसाळ्यात मूड खराब झाल्यामुळे तो सुधारण्यासाठी दारू पिण्याची इच्छा होते.
आणखी एक कारण म्हणजे पावसाळ्यात तापमान कमी असते, त्यामुळे शरिराला थंडी जाणवते. अशावेळी शरिराला उष्णतेची आवश्यकता असते. या काळात अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे ते व्हॅसोडायलेटर म्हणून काम करते, म्हणजेच शरीरातील रक्तवाहिन्या पसरवते, ज्यामुळे शरिरात ऊर्जा संचारल्याची भावना तयार होते. याच कारणामुळे थंड वातावरणात अनेकांना दारू पिण्याची इच्छा निर्माण होते. त्याचबरोबर अनेक लोक पावसाळ्यात आपल्या मित्रांना भेटतात, त्यावेळी पार्टी करतात, त्यामुळेही अनेकांना दारू पिण्याची इच्छा होते.
आरोग्य तज्ज्ञ असाही सल्ला देतात की, पावसाळ्यात दारू पिण्याची इच्छा होत असली तरी दारू पिणे टाळावे. कारण दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. अनेकजण दारू पिऊन वाहने चालवतात. त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. जर पावसाळ्यात तुमचा मूड खराब झाला असेल तर हर्बल टी, संगीत ऐका किंवा मेडिटेशन करा, यामुळे तुमचा मूड चांगला होईल. तुम्ही दारूपासून जितके दूर राहाल तितके ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे पावसाळ्यात दारू पिण्याची इच्छा झाली तरी दारू पिणे टाळा.
(टीप- वरील लेख हा केवळ माहितीसाठी आहे. पावसाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतुमध्ये दारू पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आम्ही तुम्हाला कोणत्याही ऋतुमध्ये दारू पिण्याचा सल्ला देत नाही.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List