आठ वर्षीय चिमुरडीचा दुर्गावतार, नराधमांच्या हाताचा चावा घेत आरडाओरड करत अपहरणाचा डाव हाणून पाडला; कोल्हापुरातील नांदणी गावातील थरार
कोल्हापूरच्या नांदणी गावात आठ वर्षांच्या स्वरा देसाई या चिमुरडीने अत्यंत धाडसाने स्वतःच्या अपहरणाचा डाव हाणून पाडला. तिने अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेऊन व आरडाओरड करून स्वतःची सुटका करून घेतली. ही थरारक घटना 19 सप्टेंबरला रात्री घडली. आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.
स्वरा देसाई आपल्या लहान भावासह संध्याकाळी दूध आणायला निघाली होती. त्याचवेळी मागून येणाऱ्या पाच अनोळखी व्यक्तींनी तिचे व भावाचे तोंड दाबून उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्या वेळी स्वराने धरलेल्या हाताचा जोरात चावा घेऊन आरडाओरडा सुरू केला. त्या वेळी अनोळखी व्यक्तींनी या दोघांनाही सोडून अंधारातून पळ काढला. आवाज ऐकून लोक जमा झाले. तिने घडलेली घटना सांगितली. नंतर लोक संबंधित व्यक्तींचा शोध घेऊ लागले, पण अंधाराचा फायदा घेऊन पळाले होते. गावकऱयांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
या घटनेची नोंद शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत. कोल्हापूर जिह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात संध्याकाळी घडलेला प्रकार पाहून गावकरी चक्रावून गेले. स्वराने अतिशय धाडस दाखवत स्वतःचे आणि आपल्या लहान भावाचे अपहरण टाळले. तिच्या चतुराईमुळे व धाडसामुळे गावात कौतुक होत असले तरी अपहरणाच्या टोळ्या सक्रिय आहेत का? अशी भीतीही निर्माण झाली आहे.
तपास सुरू, गावात घबराट
घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. स्थानिक नागरिकांनाही संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावातील लहान मुलांवर झालेला हा अपहरणाचा प्रयत्न ऐकून नागरिक घाबरून गेले आहेत. पालक आता आपल्या मुलांबद्दल अधिक काळजी घेत आहेत. संध्याकाळी लहान मुले घराबाहेर जाऊ नयेत याची खबरदारी घेतली जात आहे.
स्वरा नांदणीतील पीएमश्री शह तुळजाराम नागरदास कन्या विद्यामंदिरमध्ये दुसरीला दिसत आहे. तिने हा प्रकार शाळेतील विद्यार्थीनींसमोर कथन केला. या वेळी शाळेतर्फे तिचा सत्कार करून तिच्या धाडसाचे कौतुक करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List