उमेद – सामाजिक प्रश्न हाताळणारे ‘शांतिवन’

उमेद – सामाजिक प्रश्न हाताळणारे ‘शांतिवन’

>> सुरेश चव्हाण

बीड जिह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या आर्वी या छोटय़ाशा गावात कावेरी आणि दीपक नागरगोजे या दांपत्याने उभारलेला शांतिवन हा सामाजिक प्रकल्प समाजाचे खऱया अर्थाने प्रबोधन करणारा ठरला आहे.

दीपक नागरगोजे व कावेरी नागरगोजे या दांपत्याने थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या सामाजिक कार्यापासून प्रेरणा घेऊन 2000 साली आपल्या सहकाऱयांसमवेत बीड जिह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या अतिदुर्गम भागातील आर्वी या छोटय़ाशा गावाच्या माळरानावर शांतिवन या सामाजिक प्रकल्पाची सुरुवात केली. अनाथ, बेघर, बाल कामगार, तमाशा कलावंतांची मुलं, वेश्या व्यवसाय करणाऱया स्त्रियांची मुलं, ऊसतोड कामगारांची मुलं, त्याचबरोबर उपेक्षित, घटस्फोटित, परित्यक्ता महिला यांचे पुनर्वसन करण्यासाठी शांतिवनने सुरुवात केली व त्यांचा पहिला प्रकल्प उभा राहिला. अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शांतिवनात वसतिगृहे, शाळा, पुनर्वसन, शेती सुधार प्रकल्प, महिला स्वयंरोजगार प्रकल्प, जलसंधारण, ग्रामविकास अशा पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचं काम अविरतपणे सुरू आहे. त्यासाठी ‘अवंती-अंबर’ नावाने मुलांचं वसतिगृह सुरू करण्यात आलं. यातून वंचित मुलांचं शैक्षणिक पुनर्वसन करून त्यांच्या निवास व भोजनाची सोय या वसतिगृहात करण्यात आली आहे.

शांतिवन सुरू झाल्यानंतर शांतिवनच्या कार्यकर्त्यांनी वाडी-वस्ती, तांडय़ांवर फिरून वंचित, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. त्यांच्या पालकांचे प्रबोधन करून त्यांच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी प्रवृत्त केलं. सुरुवातीला 50 मुलं दाखल झाली. मुलांच्या राहण्याची व्यवस्था शांतिवनात झाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे व सततच्या दुष्काळामुळे कर्जबाजारी झालेल्या मराठवाडय़ातील हजारो शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या करून कुटुंबप्रमुख गेल्यावर त्याच्यामागे राहिलेल्या कुटुंबातील सदस्यांचे प्रचंड हाल होत असल्याने त्यांच्या मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण होतो. अशा मुलांच्या शिक्षणाचा व इतरही प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी अशा कुटुंबांना भेटी दिल्या तेव्हा त्यांना या कुटुंबांची झालेली बिकट अवस्था, मुलांची होत असलेली आबाळ त्यांच्या समोर आली. अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या मुलांचे पालनपोषण आणि शिक्षणासाठी दत्तक घेण्याचं काम शांतिवनात आजही सुरू आहे.

शांतिवनमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शाळा असल्याने फक्त दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची व्यवस्था आहे. अनाथ, वंचित मुलांसाठी काम करणाऱया संस्था वयाच्या 18व्या वर्षापर्यंतच मुलांची जबाबदारी घेतात. मुलांना ज्या वयात संस्थेच्या आधाराची खरी गरज असते, त्या वयातच मुलांना संस्था सोडून जावं लागतं. अशा मुलांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहत ‘तारांगण’ प्रकल्प सुरू केला आहे. समाजातील उपेक्षित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अनाथ महिलांसाठी शांतिवन ‘नारी निकेतन’ हा प्रकल्प राबवतं. गरजू महिलांचे प्रकल्पातच पुनर्वसन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. तसंच त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी प्रकल्पाची आहे. गेल्या नऊ वर्षांत कितीतरी महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱया विद्याथ्यासाठी इथे नवी दिशा श्रम संस्कार शिबीर घेण्यात येतं.

सुलभा सुरेश जोशी दत्तक विधान केंद्र शांतिवनमधे सुरू करण्यात आलं आहे. कुमारी माता, बलात्कारित महिला तसंच स्वतची संतती सांभाळण्यास सक्षम नसलेल्या पालकांची बालकं कायदेशीर मार्गाने दुसऱया सक्षम कुटुंबात या संस्थेमार्फत पुनर्वसित केली जातात. शांतिवनच पुढचं पाऊल म्हणून पुण्यातील मंगेश कानपाठक या शांतिवनच्या कार्यकर्त्याने पुण्यात ‘आजोळ’ या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. याद्वारे आजही काही वंचित मुलांचे शिक्षण आणि संगोपन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

शांतिवनच्या कार्यात अनेक कार्यकर्ते सहभागी असतात. त्यामध्ये सुरेश जोशी, सुलभा जोशी, विजय जोशी, शरयू जोशी, नीलिमा जोशी यांच्याबरोबरच उज्ज्वला बागडे, कावेरी हिंगे, अनिता मेढेवार ही मंडळी महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. ‘यशवंतराव चव्हाण श्रमसेवा सन्मान पुरस्कार’, ‘सर्वकार्येषु सर्वदा’ दै. लोकसत्ता, ‘सखी सन्मान’ दै. लोकमत, ‘मराठवाडा समाजरत्न पुरस्कार’, ‘बाबा आमटे मानवता पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी शांतिवनला आजवर गौरविले आहे. शिक्षण आणि संस्कारांबरोबरच या मुलांना सर्वाधिक गरजेची असलेली भावनिक मायेची ऊब येथे मिळते.
[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;