कोल्हापूर जिल्ह्यात ‘कोल्हापूर गॅझेटियर’ त्वरित लागू करा; मराठा महासंघाची मागणी
कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा कुणबींना न्याय मिळण्यासाठी ‘कोल्हापूर गॅझेटियर’ तातडीने लागू करा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाकडून आज पत्रकार परिषदेत केली.
महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, शशिकांत पाटील, रुपेश पाटील, शाहीर दिलीप सावंत, राजू सावंत, शंकर शेळके, शैलजा भोसले, संयोगिता देसाई आदी उपस्थित होते.
वसंत मुळीक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याच्या सन 1881च्या गॅझेटियरनुसार एकूण लोकसंख्या 8 लाख 189 होती. त्यापैकी कुणबी लोकसंख्या 2 लाख 99 हजार 350 होती. मराठा लोकसंख्या नोंद 62 हजार 287 इतकी होती. शेती करणारे; पण लढवय्ये कुणबी व शिपाईपणाचा बाणा बाळगणारे शूर मराठे व मराठी भाषा बोलणारे मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये फारसा भेद दिसत नाही. कुणबी आणि मराठा यांचा परस्पर अन्न व लग्न व्यवहार चालतो. दोघांचे राहणीमान, स्वभाव, देवक, आहार, शेतीसह जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या रुढी-परंपरा यात इतके साम्य आहे की, मराठा कुणबी या दोघांत रोटी-बेटी व्यवहार (लग्न) होतात. त्यामुळे इतिहास संशोधकांच्या मते मराठा कुणबी एकच आहेत, हे गॅ झेटियरवरून सिद्ध होते.
सन 1882 साली 2 लाख 99 हजार 350 कुणबी संख्या होती. ती सन 2025 साली 15 लाखांवर झाली असावी. त्या प्रमाणात कुणबी दाखले मिळणे अपेक्षित असताना, सन 2021 पासून फक्त 6 हजार 750 कुणबी दाखले प्रमाणपत्रे मिळाली आहेत. लाखांच्या संख्येत दाखले मिळणे अपेक्षित असताना, ते अल्प मिळाले आहेत. त्यामुळे लाखो कुणबी गेले कोठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
न्यायमूर्ती संदिप शिंदे समितीच्या कुणबी शोधमोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात सध्या दीड ते दोन लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. पण 1932 सालानंतर सर्वसाधारण कुणब्यांनी मराठा नोंद केल्याने कुणबी दाखले मिळणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेटप्रमाणे कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.
सन 1881 सालच्या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे, असे स्पष्ट असताना सन 1996च्या गॅझेटमध्ये मराठा कुणबी वेगवेगळे दाखविण्याचे षडयंत्र कोणी केले ? सन 1881 च्या मूळ गॅझेटियरमध्ये 1996 साली फेरफार करून मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान कोणी केले तसेच 1994 साली शंभरपेक्षा जास्त जाती ओबीसीमध्ये घालताना कुणबी जातीलाच बाहेर का ठेवले, याचे उत्तर द्यावे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List