एलईडी बल्ब फुफ्फुसात अडकला, साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला डॉक्टरांनी दिले जीवदान
जसलोक रुग्णालयातील डॉक्टरांनी एका साडेतीन वर्षाच्या मुलाची दुर्मिळ शस्त्रक्रिया करत त्याला जीवदान दिले आहे. मुलाच्या फुफ्फुसात धातूचा एलईडी बल्ब अडकला होता. यामुळे मुलाला सतत खोकला आणि श्वसनाचा त्रास होत होता. अत्यंत दुर्मिळ आणि असाधारण अशी शस्त्रक्रिया जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडत मुलाला जीवदान दिले.
सुरुवातीला मुलगा न्यूमोनिया आजार असल्याचे निदान झाले होते. न्यूमोनियावर अँटीबायोटिक्सचे अनेक औषधोपचार करण्यात आले. मात्र औषधोपचार करूनही मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलाचे सीटी स्कॅन केले असता यात त्याच्या डाव्या ब्रोन्कसमध्ये खोलवर धातूचा भाग असल्याचे आढळून आले.
कोल्हापूरात फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपीच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर मुलाला जसलोक रुग्णालयात आणण्यात आले. ब्रॉन्कोस्कोपीमध्ये एलईडी बल्ब ब्रोन्कसमध्ये आढळून आला. जसलोक रुग्णालयाचे डॉ. विमेश राजपूत आणि डॉ. दिव्य प्रभात यांनी मुलाची मिनी थोरॅकोटॉमी करत फुफ्फुसातून एलईडी बल्ब यशस्वीरित्या बाहेर काढला. अॅनेस्थेसियोलॉजी सल्लागार डॉ. अनुराग जैन यांनी या शस्त्रक्रियेत मोठे सहकार्य केले.
“आम्ही ऑपरेट केलेली ही सर्वात दुर्मिळ केस होती. एलईडी बल्ब फुफ्फुसामध्ये खोलवर गेला होता. मिनी थोरॅकोटॉमीसह आम्ही सुरक्षितपणे एलईडी बल्ब बाहेर काढला आणि मुलाला जीवनदान मिळाले”, असे जसलोक हॉस्पिटलमधील थोरॅसिस सर्जन डॉ. विमेश राजपूत यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List