Ratnagiri News – संगमेश्वरातील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा जयगड खाडीत आढळला मृतदेह
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर रामाणेवाडी येथून बेपत्ता झालेल्या 15 वर्षीय मुलीचा जयगड देऊड खाडीत मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. याबाबत जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुलीने आत्महत्या केली की घातपात झाला? याबाबत जयगड पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता पीडित मुलगी संगमेश्वर येथून बेपत्ता झाली होती. तिच्या घरच्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेरीस संगेमश्वर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून आठ दिवस तिचा शोध सुरू होता. दरम्यान सोमवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता तिचा मृतदेह देऊड येथील खाडीत आढळून आला.
परिसरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर जयगड पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. जयगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मुलीची ओळख पटवण्यासाठी पुढील चौकशी सुरू केली. चौकशीत संगमेश्वर पोलीस ठाण्यात सदर मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांशी संपर्क साधून तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली. तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List