नेपाळमध्ये आंदोलन पेटलं, देशभरात हिंसाचाराच्या घटना; हिंदुस्थानी नागरिकांसाठी अॅडव्हायझरी जारी
नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सरकारविरोधी आंदोलने तीव्र झाली असून, अनेक ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर, हिंदुस्थानी नागरिकांसाठी केंद्र सरकारने प्रवासाविषयी महत्वाची अॅडव्हायझरी जारी केली आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपति रामचंद्र पौडेल यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे, ज्यामुळे देशातील राजकीय अस्थिरता आणखी वाढली आहे.
नेपाळमधील आंदोलने प्रामुख्याने सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सुरू झाली. सोमवारी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत 20 जणांचा मृत्यू झाला, तर 400 हून अधिक जण जखमी झाले. मंगळवारी आंदोलनांनी आणखी उग्र रूप धारण केले. आंदोलकांनी पंतप्रधान ओली यांचे खासगी निवासस्थान, संसद भवन आणि इतर सरकारी इमारतींना आग लावली. नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांना जमावाने मारहाण केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. काठमांडूमधील अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
हिंदुस्थानची अॅडव्हायझरी आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक
हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) नेपाळमधील परिस्थिती गंभीर असल्याने हिंदुस्थानी नागरिकांना नेपाळ प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. जे हिंदुस्थानी नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत, त्यांना घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि स्थानिक प्रशासन तसेच काठमांडू येथील हिंदुस्थानी दूतावासाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी खालील क्रमांक जारी करण्यात आले आहेत:
+977-9808602881 (व्हॉट्सअॅप उपलब्ध)
+977-9810326134 (व्हॉट्सअॅप उपलब्ध)
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “नेपाळमधील परिस्थिती लक्षात घेता, हिंदुस्थानी नागरिकांनी जोपर्यंत परिस्थिती स्थिर होत नाही तोपर्यंत प्रवास टाळावा. सध्या नेपाळमध्ये असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांनी घरातच राहावे, तसेच सर्व काळजी घ्यावी.”
Advisory for Nepal @MEAIndia pic.twitter.com/lLoMTi5HgQ
— IndiaInNepal (@IndiaInNepal) September 9, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List