Sindhudurg News – भूमी अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा…; वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयात 70 टक्के अधिकारी व कर्मचारी पदे रिक्त आहेत. 8 तालुक्यांपैकी 6 तालुक्यात तालुका भूमी अभिलेख अधिकारी नाहीत. केवळ 2 तालुका भूमी अभिलेख अधिकाऱ्यांवर 8 तालुक्यांचा पदभार आहे. त्यामुळे नागरिकांची जमीन मोजणीची कामे रखडली आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना जमिनीचे नकाशे मिळत नाहीत. नागरिकांना एकाच कामासाठी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत. एजंटचा सुळसुळाट सुरू आहे. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत. येत्या महिन्याभरात हे प्रश्न सुटले नाही आणि शासनाने भूमी अभिलेखच्या रिक्त पदांवर अधिकारी व कमर्चारी भरती केली नाही तर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग कार्यालयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाच्या बाबतीत नागरिकांना विविध तक्रारी येत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सोमवारी (08 सप्टेंबर 2025) ओरोस येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग कार्यालयात भेट दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक उपस्थित नसल्याने भूमी अभिलेखचे उप अधिक्षक विठ्ठल गणेशकर व विनायक ठाकरे यांच्या समवेत बैठक घेण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, अतुल बंगे, बाळू पालव, सिद्धेश राणे, अमित राणे, संजय रावले आदी उपस्थित होते. भूमी अभिलेख कार्यालयात गेल्यानंतर सावळा गोंधळ दिसून येत आहे. मोजणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरताना अनेक अडचणी येत आहेत. मोजणीसाठी अर्ज भरणाऱ्या पक्षकाराला नाहक भूर्दंड पडत आहे. तसेच नकाशा कामासाठी सुद्धा असलेल्या अधिकाऱ्यांकडून लूट केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयांमधील नागरिकांचा त्रास थांबवा, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List