अहिल्यानगरमध्ये 8 कोटीची सुपारी आणि तंबाखू जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
राहुरी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईत 8 कोटी 43 लाख रुपयांची गुटखा निर्मितीसाठी लागणारी सुपारी आणि तंबाखू जप्त करण्यात आले आहे. कर चुकवून व बनावट बिले तयार करून 13 ट्रकमधून अवैधरित्या या सुपारी आणि तंबाखूची वाहतूक सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सर्व मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. याप्रकरणी 10 जणांना ताब्यात घेतले आहे.
अबरार अल्लाउद्दीन खान, तोफिक हनिफ खान, अक्रम इसब खान, इर्शाद ताजमोहमंद मेह, अशोक पोपट पारे, रखमाजी लक्ष्मण मगर, कालीदास बाबुराव काकडे, आसिफ पप्पु मेव, जमशेर अब्दुल रज्जाक खान, सचिन जिजाबा माने अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
कर्नाटक येथून सडलेली लाल सुपारी व तंबाखू गुजरातमध्ये गुटखा तयार करण्यासाठी अवैधरित्या नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुरी तालुक्यातील चिचोली शिवारात हॉटेल महालक्ष्मी, चौधरी पॅलेस परिसरात सापळा रचून 13 ट्रक ताब्यात घेतले. चालकांची चौकशी केली असता सदर माल कर्नाटक येथील मोहंमद अक्रम यांचा असून तो गुजरातला गुटखा निर्मितीसाठी नेत असल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान चालकांकडे वाहतूक परवाना किंवा वैध ई-वे बिल सापडले नाही. त्यांच्याकडील बिले ही हस्तलिखित व बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अहिल्यानगर वस्तू व सेवा कर विभाग पुढील कारवाई करत आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List