हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला कडाडून विरोध, शिवसेनेचे रविवारी ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन;पंतप्रधान मोदींना घराघरातून कुंकू पाठवणार

हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला कडाडून विरोध, शिवसेनेचे रविवारी ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन;पंतप्रधान मोदींना घराघरातून कुंकू पाठवणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कुंकू पुसले गेलेल्या माताभगिनींचा आक्रोश थांबला नसतानाच पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला शिवसेनेने कडाडून विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात रविवारी शिवसेना महिला आघाडी ‘माझं कुंकू, माझा देश’ हे आंदोलन करणार आहे. शिवसेनेच्या हजारो रणरागिणी रस्त्यावर उतरणार आहेत. त्याच वेळी पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राच्या घराघरातून महिला कुंकू पाठवणार आहेत.

आशिया कप स्पर्धेतील हिंदुस्थान-पाकिस्तानचा सामना 14 सप्टेंबर रोजी अबुधाबीमध्ये होणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच या संदर्भात भूमिका मांडली होती. मात्र, सरकारने हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला हिरवा कंदील दाखवला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेटला रस्त्यावर उतरून विरोध करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी आज दिले. त्यानुसार रविवारी शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरणार असून हजारो महिला प्रत्येक घरातून पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी केलेल्या भावनिक घोषणांची आठवण त्याद्वारे करून दिली जाणार आहे.

आरएसएस, बजरंग दलाला काही भूमिका आहे की नाही?

‘सरकार स्वतःच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी कोणतीही कारणे देईल. पण भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची याविषयी काही भूमिका आहे की नाही’ हा प्रश्न आहे. पाकिस्तानशी कुठलेही नाते ठेवणार नाही. पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही असे हेच सरकार म्हणाले होते, मग आता रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे चालते? असा सवाल संजय राऊत यांनी केला. ‘कुंकवात मोठी ताकद असते, पण मोदींनी कुंकवाचे केवळ राजकारण केले. ते आता कुंकवाला विसरले आहेत. पाकिस्तानशी नाते ठेवणार नाही असे ते सांगत होते, आता याच भाजपच्या मंत्र्यांची मुले मॅच बघायला जातील’, असा टोलाही त्यांनी हाणला.

सामना रद्द करण्यास न्यायालयाचा नकार

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालायने आज नकार दिला. ‘एवढी काय घाई आहे, हा फक्त एक सामना आहे. तो होऊ द्या… याच रविवारी सामना आहे, आता काय करू शकतो?’ असे न्यायालय म्हणाले.

पाकिस्तानशी क्रिकेट हा देशद्रोह!

‘ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही’ असे सरकारनेच सांगितले आहे. पहलगाममध्ये ज्यांचे कुंकू पुसले गेले, त्याच्या वेदना अजूनही कायम आहेत. त्या भगिनी आजही धक्क्यात आहेत. असे असताना पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणे हा निर्लज्जपणा आहे. हा सरळ सरळ देशद्रोह आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

12 सरकारी बँकांचे विलिनीकरण होणार 12 सरकारी बँकांचे विलिनीकरण होणार
देशातील 12 सरकारी बँकांच्या विलिनीकरणाच्या हालचाली सुरू आहेत. या विलीनीकरणाला बँक कर्मचारी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार...
माणसांपेक्षा एआय जास्त बुद्धिमान होणार, मस्क यांचा खळबळजनक दावा
नारी शक्ती! त्रिवेणी जहाजावरून 26 हजार मैल अंतर कापणार, 10 महिला जवान 9 महिने सागरीविश्व प्रदक्षिणेवर
Karishma Sharma – मुंबईत धावत्या लोकलमधून बॉलिवूड अभिनेत्रीनं उडी घेतली; स्वत: सांगितलं नेमकं काय घडलं?
रशियन सैन्यात भरतीच्या ऑफरपासून दूर राहा, केंद्र सरकारचा देशातील तरुणांना सल्ला
बँकांना बळकटी पण, कर्मचारी कपातीचा धोका
आयफोनची उद्यापासून प्री ऑर्डर, 19 सप्टेंबरला पहिला सेल