वर्तमानपत्रातून येणाऱ्या घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती बंद करा; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वर्तमानपत्रातून येणाऱ्या घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती बंद करा; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Shiv Sena News :

आचार संहिता लागू केली असेल तर वर्तमानपत्रातून येणाऱ्या सरकारी जाहिराती बंद झाल्या पाहिजेत. आणि जर त्या सुरू ठेवायच्या असतील तर त्याचा खर्च घटनाबाह्य सरकारमधल्या प्रत्येकाच्या खात्यातून जमा केला पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारवर घणाघात केला. भायखळा येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखाभेटीवेळी ते बोलत होते.

रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘रेल्वे स्टेशनची नावं बदलण्यासाठी एका उडाणटप्पूने सांगितलं की त्यांनीच पत्र दिलं आणि नावं बदलण्यात आली. रेल्वे स्टेशनची नावं जरूर बदला, पण स्वतःला डबल इंजिन सरकार म्हणतात, आता ते ट्रिपल इंजिन झालं आहे. अशोक चव्हाणांचं चौथं इंजिनही सरकारला लागलं आहे. पण या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत. त्याचं काय? आता मेट्रो, मोनो, इलेक्ट्रिक गाड्या आल्यात. पण आमच्या लहानपणी एक गाणं होतं, झुकझुक झुकझुक आगीन गाडी, धुरांच्या हवेत सोडी.. आणि वाफेवर चालणारं इंजिन होतं. यांचं थापेवरती चालणारं इंजिन आहे, ते वाफा सोडायचं हे थापा सोडताहेत. सगळ्या थापा आणि थापा. ‘

गद्दारांवर कडाडून टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आतापर्यंत शिवसेना फोडण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. इथेच जवळच माझगावमध्ये झाला होता. आणि त्याला एका साध्या सैनिकाने आडवा केला होता. त्यामुळे गद्दारांना गाडणं हे आपल्या रक्तातच आहे. यावेळी नुसती गद्दारी नाही तर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झाला आहे. जे बूट चाटणारे गद्दार सत्तेच्या खुर्चीसाठी चाटुगिरी करताहेत, त्यांना एवढं पण कळत नाही, त्यांनी आईच्या कुशीवर वार केला आहे. ज्या शिवसेनेने महाराष्ट्राची, मराठीची अस्मिता आणि हिंदुत्वाचं रक्षण केलं, ती ताकद त्यांच्याच माध्यमातून संपवली जातेय हे त्या लाचारांना कळत नाही. कारण, ते एवढे खोक्यात बंद झालेत. डोळ्यावरती नोटांची झापडं लागली आहेत. त्यांना कळतच नाही आपण काय करत आहोत. ही नुसती पक्ष फोडाफोडीची गोष्ट असती तर वेगळा भाग होता. पण त्यांना महाराष्ट्र लुटण्यासाठी शिवसेना संपवायची आहे. जो ते लुटताहेत. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र लुटण्याची त्यांची हिंमतच नव्हती. महाराष्ट्राच्या विरोधात एक शब्द काढण्याची त्यांची हिंमत नव्हती आता उघडउघड महाराष्ट्र लुटत आहेत. आता हे जे पत्रवीर आहेत जे स्टेशनची नावं बदला सांगताहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र लुटला जातोय त्याच्याविरुद्ध तुम्ही पत्र लिहा किंवा स्वतःचं नाव बदला. पण ही फुकटची मर्दानगी आम्हाला शिकवायला जाऊ नका. कारण शिवसेनेत तुम्ही गद्दार झालात तरी मर्द संपलेले नाहीत. ते संपू शकत नाहीत.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा – भाजप ED च्या पदराआडून अजून किती रडीचा डाव खेळणार? शिवसेनेचा घणाघात

भाजपच्या लुटीच्या कारभारावर आसूड ओढताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 1996-97पासून मुंबईकरांनी सातत्याने शिवसेनेच्या हाती मुंबई पालिका दिली आणि याचा मला अभिमान आहे. 2012 साली मुंबईची परिस्थिती बिकट होती. कारण 640 कोटींची तूट होती. त्यानंतर 2021-22 पर्यंत आपल्या हातात असताना, ती तुटीतून आपण 90 हजार कोटींच्या नफ्यात आणली. मग कुणी खाल्ले पैसे? स्वतः निवडणूक रोख्यांचे पैसे खाल्ले, पीएमकेअर फंडात खाल्ले ते वेगळेच, ते लोकांवर पैसे खाल्ल्याचे आरोप करतात. मला मिळालेली माहिती भयानक आहे, आताच घटनाबाह्य सरकारने 1 लाख कोटींच्या कामांच्या प्रस्तावाला प्रशासकाच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे. कारण, तिथे समोर प्रश्न विचारण्यासाठी लोकप्रतिनिधी नाही. त्यातले 90 हजार कोटी तर जातीलच पण उरलेल्या दहा हजार कोटींचं कर्ज होईल ते वेगळंच. आपण इतकी मोठी तूट भरून का काढू शकलो तर ऑक्ट्रोय विभागाचं उत्पन्न होतं, इतर मोठ्या कार्यालयाचं, हिरेबाजाराचं उत्पन्न होतं, करसंकलन होत होतं. अख्ख्या देशात केंद्रात जाणाऱ्या कराच्या 36 ते 37 टक्के हिस्सा एकटी मुंबई म्हणजे तुम्ही मुंबईकर उचलता. मग आता तुम्ही विचार करा की जर आपल्या डोक्यावर पुन्हा हजारो कोटींचं कर्ज झालं तर आता आपल्याकडे ऑक्ट्रोय नाही कारण जीएसटी आहे. हिरे व्यापार, महाराष्ट्रातले उद्योगधंदे ते गुजरातला नेताहेत. काही महत्वाची कार्यालयं दिल्लीला आणि गुजरातला न्यायची. म्हणजे थोडक्यात कुणाकडेही पैसा ठेवायचा नाही. रोज तुम्हाला पैसा लागेल तेव्हा तुम्ही माझ्याकडे भीक मागायला आलाच पाहिजे अशी यांची वृत्ती आहे. आग्र्यात औरंगजेबापुढे न झुकणारा महाराष्ट्र तुमच्यासमोर झुकेल असं तुम्हाला वाटतं?, असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

सरकारी जाहिरातबाजीवरही उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. ‘आचारसंहिता लागू केली असेल आणि कायद्यासमोर जर सगळे सारखे असतील तर वर्तमानपत्रातून येणाऱ्या सरकारच्या जाहिराती बंद झाल्या पाहिजेत. कारण त्यावर घटनाबाह्य सरकारचे फोटो येताहेत, पंतप्रधानांचे फोटो येताहेत. जर जाहिराती सुरू ठेवायच्या असतील तर त्याचा खर्च प्रत्येकाच्या खात्यातून जमा केला पाहिजे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, लोकशाही देशात खरोखर राबवायची असेल तर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि जसे पक्षाचे नेते फिरतो तसं त्यांनी फिरलं पाहिजे. तुमच्या लवाजम्याचा खर्च सरकारच्या तिजोरीतून, करदात्यांच्या पैशातून होणार. पंतप्रधान देशाचा असतो, पक्षाचा नसतो. जर पंतप्रधान भाजपचा प्रचार करणार असतील तर त्यांनी सगळ्याच पक्षांचा प्रचार करावा. तर आम्ही मानू की आम्ही मोदी परिवार आहोत. पण निवडणूक आल्यानंतर सबका साथ आणि निवडून आल्यावर सबको लाथ आणि दोस्तोंका विकास.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;