AAP PROTEST : पंतप्रधान निवासाला घेराव घालण्याचा प्रयत्न; ‘आप’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक केल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनीही या अटकेचा निषेध नोंदवला. तर आपच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी आंदोलने केली. आता मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालणार होते. मात्र त्याआधीच त्यांच्या निवासस्थानाजवळील सुरक्षेत वाढ करण्यात आली. घेराव घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात गोवून त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अटक केली आहे. दोन वर्षांच्या तपासानंतर निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक केली. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी केजरीवाल यांना घाबरतात, अशी टीका ‘आप’ नेत्या अतिशी यांनी केली.
अरविंद केजरीवाल यांची सुटका करण्याची मागणी करत ‘आप’ नेत्या रिना गुप्ता म्हणाल्या, ‘त्यांची अटक ही चुकीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केजरीवाल यांना घाबरतात म्हणूनच लोकसभा निवडणुकीचा प्रचारापासून दूर करण्यासाठी ही अटक करण्यात आली आहे.’
आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते पटेल चौक मेट्रो स्टेशनच्या बाहेर एकत्र जमले. अरविंद केजरीवाल जिंदाबाद… अशा घोषणा देत होते. दरम्यान, पोलीस तिथून त्यांना हटविण्याचा प्रयत्न करत होते.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा ‘आप’च्या नेत्यांनी दिला होता. पोलिसांनी खबरदारी म्हणून सात लोकककल्याण मार्ग बंद केला. दरम्यान, पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेले ‘आप’चे नेता हरज्योतसिंग बैंस यांना दिल्ली पोलिसांनी पटेल चौक मेट्रो स्टेशनवरून ताब्यात घेतले.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आपचे कार्यकर्ते पटेल चौकातील मेट्रो स्टेशनच्या बाहेर जमा झाले होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीसांनी कलम 144 लागू केल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत कोणालाही आंदोलन करण्याची परवानगी नाही. यामुळे पाच मिनिटांत परिसर रिकामा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या ताब्यात असतानाही मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधांची कमतरता भासू नये, असे निर्देश दिल्याचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List