शरद पोंक्षेंच्या मुलाचं दिग्दर्शनात पदार्पण; बापलेकाची जोडी करणार एकत्र काम
नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण अभिनेते शरद पोंक्षे यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच ते निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांचा पुत्र म्हणजेच स्नेह पोंक्षे करणार आहे.
सध्यातरी या चित्रपटाचं नाव ठरलेलं नसलं तरी या चित्रपटाच्या निमित्ताने बापलेकाची जोडी मात्र एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाच्या टीमने प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं आशीर्वाद घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला.
वि. एस. प्रोडक्शन्स आणि मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या ‘प्रॅाडक्शन नं 1’ या नावाने होत असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचं लेखन स्नेह पोंक्षे याने केलं आहे.
याबद्दल शरद पोंक्षे म्हणाले, "एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या सोबतीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षे सहदिग्दर्शक म्हणून काम केलं आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List