मिंधे, अजित पवार दिल्लीचे मांडलिक; संजय राऊत यांचा हल्लाबोल
शिवसेनेची उमेदवारांची पहिली यादी तयार आहे. आजच्या दिवसात ती प्रसिद्ध केली जाईल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी आपले जागावाटप पूर्ण केले आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. त्यांना महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे, तो कायम आहे. त्यांच्याशी याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. देशात आणि राज्यात ईदी आमनचे राज्य हुकूमशाही सुरू आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच गिळण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वेळी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहतील, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
जागावाटपाबाबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीही नाही. त्यांचे दिल्लीतील नेते जे सांगतील, ज्या जागा देतील, त्याच त्यांना मिळतील. पूर्वी महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत मातोश्रीवर चर्चा होत असत आणि मातेश्रीतूनच निर्णय घेतले जात होते. आता शिंदे, अजित पवार यांना दिल्लीत जावे लागते. छत्रपती उदयनराजे यांनीही दिल्लीत जावे लागते. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीने एकत्रितपणे राज्यातच निर्णय घेतला. आमचे निर्णय आम्ही महाराष्ट्रातच घेतो. आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही, असेही त्यांनी ठणकावले.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठा नाही. ब्रिटीश आणि मोगल काळात मांडलिक, संस्थानिक यांना जे स्थान होते, तेच अजित पवार आणि शिंदे यांचे महाराष्ट्रात आहे. स्वतःचे निर्णय घेण्याची कुवत, हिंमत आणि अधिकार या दोन्ही नेत्यांना नाहीत. ते मांडलिक आहेत. त्यांना वारंवार दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांच्या हिरवळीवर बसावे लागते. इकडे येताना त्यांच्या कपड्यांवर तेथील गवत दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.
रामलीला मैदानावर 31 तारखेला हुकूमशाहीविरोधात महामेळावा होणार आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांना ज्या प्रकारे अटक केली. त्यावरून देशात हुकूमशाहीचे राज्य आहे, असे दिसून येते. या हुकूमशाहीविरोधात देशभरातील नेते एकत्र येणार आहेत. या प्रकरणात खोटे, पुरावे, बनावट खटले दिसून येत आहेत. या मेळाव्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List