चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलींना पेट्रोल टाकून जाळले, नराधम पतीला अटक
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलींना घरात डांबून पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना आज सकाळी नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी सांगितले.
लीलाबाई सुनील लांडगे (वय 35), मुलगी साक्षी सुनील लांडगे (वय 14) आणि खुशी सुनील लांडगे (दोन वर्षे) अशी मृत्यू झालेल्या माय-लेकींची नावे आहेत. सुनील लांडगे (वय 45) असे अटक करण्यात आलेल्या नराधम पतीचे नाव आहे.
आरोपी सुनील लांडगे हा पत्नी लीलाबाई आणि दोन मुली साक्षी आणि खुशी यांच्यासह पिंपळगाव लांडगा गावात राहत होता. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी सुनीलने घरामध्ये पत्नी आणि मुलींच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. क्षणात आगीचा भडका होऊन तिघीजणींचा गंभीररीत्या भाजून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, पत्नी आणि मुलींना डांबून ठेवल्याचे दिसून आले. तेथे मोठय़ा प्रमाणात पेट्रोलचा वास येत होता. तिघींचाही जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. पोलिसांनी नराधम पती सुनील लांडगे याला अटक केली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. यावरून त्यांच्यात वाद होत होत असल्याचे तपासामध्ये समोर आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List