सोलापुरातून बीडचे पार्सल परत पाठवू या! उमेदवारीवरून ‘आयात’ उमेदवार राम सातपुते ट्रोल
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने मूळचे बीडचे आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. ‘बाहेरचा’, असा उल्लेख करत एसटीच्या फोटो पाठीमागे लिहिलेले आहे. ‘चला, लागा कामाला, बीडचे पार्सल बीडला परत पाठवू या,’ असे सध्या सोशल मीडियावर होणारे जोरदार ट्रोलिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोलापूर लोकसभेची निवडणूक परंपरेनुसार काँग्रेस पक्षच मारत आलेला आहे. मात्र, 2014 आणि 2019 मध्ये इथे काँग्रेसचा पराभव झाला. तरीही सर्व धर्मियांचा सोलापूर म्हणून हा जिल्हा परिचित आहे. मात्र, आता भाजपने थेट बीड जिह्यातून लोकसभेसाठी उमेदवार आयात केल्यामुळे भाजपसह इतर पक्षीयांनीही राम सातपुतेंविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे.
नाराज भाजपनेते; कार्यकर्त्यांचा बसणार फटका
सोलापूर लोकसभेसाठी भाजपमधून उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. भाजपकडून प्रसिद्ध उद्योजक तथा दलित चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रिजचे संस्थापक-अध्यक्ष, पद्मश्री मिलिंद कांबळे यांचेही नाव चर्चेत होते. तसेच आमदार शिंदे यांनी माढय़ातील उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना राम सातपुते यांनी समर्थन दिले होते. याचा राग ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील गटाला आहे. त्यामुळे राम सातपुते यांना नाराज भाजपनेते आणि कार्यकर्त्यांकडून किती बळ मिळेल, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
मी सोलापूरची लेक – प्रणिती शिंदे
काँग्रेसने सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून, काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रचार मोहिमेला धुमधडाक्यात सुरुवात केली आहे. राम सातपुते यांच्याविरोधात ‘स्थानिक’ आणि ‘बाहेरचा’ असा मुद्दा उपस्थित करून प्रणिती यांनी सातपुते यांच्यावर निशाणा साधला आहे. सातपुते यांना सोशल मीडियावर खुले पत्र लिहून त्यांचे स्वागत केले आहे. मात्र, हे स्वागत करताना तुम्ही बाहेरचे उमेदवार असून, मी सोलापूरची लेक असल्याचे मतदारांच्या मनावर ठसवण्यात प्रणिती यशस्वी झाल्या आहेत.
काँग्रेसकडून लोकांचे प्रश्न, विकास केंद्रस्थानी
लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. पुढील 40 दिवस याचे भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो, यावर लढाई लढू, अशी मी आशा करते, असे प्रणिती शिंदे यांनी खुले पत्र सोशल मीडियावर लिहिले आहे. दरम्यान, राम सातपुते यांनीही ऊसतोड कामगाराचा मुलगा असल्याचे भावनिक आवाहन करत पत्राला उत्तर दिले आहे.
डॉ. जयसिद्धेश्वर महाराजांचा पत्ता कट
सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन विद्यमान आमदारांची लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांना, तर भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक विरुद्ध उपरा, अशी चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांचा पत्ता कट झाल्याने भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांत नाराजीचे चित्र दिसत आहे.
लिंगायत समाज नाराज
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार, माजी मंत्री विजय देशमुख व सुभाष देशमुख यांनी त्यांच्या स्वागताला दांडी मारल्याचे दिसून आले. तसेच खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांचा पत्ता कट झाल्याने लिंगायत समाज नाराज असून, याचा फटका राम सातपुतेंना अक्कलकोट, शहर उत्तर व दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघांत बसणार आहे. संभाव्य अडचणी पाहूनच भाजपचे दोन्ही आमदार विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्यासह त्यांचे समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आजच्या रॅलीकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List