गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा सवाल; मुजोर पोलिसांवर अॅट्रॉसिटी कलामाखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी
राज्यातील पोलीस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलीस मात्र सर्वसामान्य जनतेवर कायद्याची दंडेलशाही दाखवत आहेत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. तसेच पुण्यातील कोथरूड पोलीसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले, त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर अॅट्रॉसिटी कलमाखाली तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या मुजोर पोलिसांना कोण पाठिशी घालत आहे? पुण्याचे पोलीस आयुक्त काय खुर्चीवर बसून झोपा काढतात काय. कोणाच्या दडपणाखाली पोलीस काम करत आहेत. तीन तरूण मुलींवर पोलीस अत्याचार करतात आणि कारवाई होत नाही. एफआयआर नोंदवण्यास कोणत्या मुहुर्ताची वाट पहात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने या प्रकरणी लक्ष घालून मुजोर पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
पुण्यात ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे, कोयता गँगचा हैदोस सुरु आहे, त्याला आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे असे खुद्द मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत पण कारवाई मात्र करत नाहीत, असा हतबल मुख्यमंत्री काय कामाचा. पुणे पोलीसांनी सर्वसामान्य लोकांना कायद्याचा नाहक बडगा दाखवण्याऐवजी पुण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम करण्याची गरज आहे, असेही सपकाळ म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List