लग्नात वारेमाप खर्च टाळा… डीजे नको, पारंपरिक वाद्ये वाजवा! मराठा समाजाची 20 कलमी आचारसंहिता

लग्नात वारेमाप खर्च टाळा… डीजे नको, पारंपरिक वाद्ये वाजवा! मराठा समाजाची 20 कलमी आचारसंहिता

लग्न समारंभातील वारेमाप खर्च टाळण्यासाठी मराठा समाजाने 20 कलमी आचारसंहिता तयार केली आहे. लग्न सोहळय़ावर जास्त खर्च करू नये, डीजे, प्री-वेडिंग शूट, हुंडा यांना फाटा द्यावा आणि पारंपरिक वाद्य, लोककलावंतांना संधी द्यावी, अशा अटी वधू-वर पक्षासाठी घालण्यात आल्या आहेत. रविवारी संत-महंतांच्या उपस्थितीत या आचारसंहितेची शपथ घेण्यात आली.

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हुंडा प्रथेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने लग्न समारंभाबाबत नवीन नियमावली तयार करण्याचे ठरवले होते. त्यानुसार अहिल्यानगर येथे मराठा समाजाचे लग्न आचारसंहिता संमेलन पार पडले. यावेळी डोंगरगणचे जंगले महाराज शास्त्री, देवगडचे भास्करगिरी महाराज, ‘पद्मश्री’ पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, उद्योजक एन. बी. धुमाळ, माजी आमदार साहेबराव दरेकर, किशोर मरकड, अशोक कुटे यांच्यासह मराठा समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मराठा समाजातील मुला-मुलींच्या लग्न समारंभासाठी नवीन नियमावली तयार केली. लग्नानंतर हुंडय़ावरून वाद होऊ नयेत हा प्रमुख उद्देश डोळय़ासमोर ठेवून 20 कलमी आचारसंहिता बनवली आहे. त्यात जाचक प्रथांवर बंदी घातली असून, पारंपरिक वाद्ये आणि कलावंतांना संधी दिली आहे.

आचारसंहितेत काय आहे?

लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दाम्पत्यांनी मर्यादा पाळाव्यात. प्री-वेडिंग शूट टाळावे. जर तसे शूट केले तर त्याचे जाहीर प्रदर्शन करू नये.

लग्न सोहळय़ात डीजे, हुंडा, सत्कार, भाषणे या गोष्टींना फाटा द्यावा.

लग्न सोहळा जास्तीत जास्त 500 लोकांच्या उपस्थितीत करावा.

लग्नानंतर मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. मुलीला तिच्या आईने वारंवार फोन कॉल करू नये.

कर्ज काढून लग्नावर खर्च करू नये. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱयांना पायबंद घालावा.

वरमाला घालताना नवरा-नवरीला उचलू नये.

लग्नात फक्त वधुपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत.

चांगल्या प्रथा, परंपरा जपणार

लग्न समारंभांबरोबरच वाढदिवस आणि उद्घाटन कार्यक्रमांत पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख रक्कम स्वरूपात आहेर करावेत. तसेच लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या यांसारख्या वस्तू देण्यास मनाई केली आहे. चांगल्या प्रथा-परंपरा पुढे सुरू ठेवल्या पाहिजेत, मात्र काही लोक चुकीच्या प्रथा लग्न समारंभात घुसवत आहेत. ते टाळण्यासाठी आचारसंहिता बनवली आहे, असे ह.भ.प. जंगले शास्त्री महाराज म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;