मोदींच्या ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’च्या नाऱ्याची अशीही धुळवड; घोटाळेबाज जनार्दन रेड्डी पुन्हा भाजपमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, असा नारा देत असले तरी तो हवेतच विरला आहे. कर्नाटकात तर भाजपने या नाऱ्याची धूळवडच खेळली. हजारो कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि तुरुंगवास भोगलेले जी. जनार्दन रेड्डी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच, रेड्डींनी आपला राज्य प्रगती पक्षही भाजपमध्ये विलीन केला.
बंगळुरू येथे भाजप प्रदेश कार्यालयात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत जी. जनार्दन रेड्डी यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. रेड्डी यांच्या राज्य प्रगती पक्षाचे ते एकमेव आमदार आहेत. हा पक्षही त्यांनी भाजपमध्ये विलीन केला. बेल्लारी मतदारसंघात भाजपने रेड्डी यांचे निकटवर्तीय बी. श्रीरामल्लू यांना उमेदवारी दिली आहे.
2006 मध्ये भाजपने जनार्दन रेड्डी यांना विधान परिषदेवर पाठविले. 2008ला कर्नाटकात भाजपची पहिल्यांदा सत्ता आली आणि बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्री बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात जनार्दन रेड्डी मंत्री झाले.
जनार्दन रेड्डी बंधूंनी कर्नाटकातील बेल्लारी आणि आंध्रप्रदेशातील अनंतपूरमध्ये अवैध खाणी मिळविल्या. यात रेड्डींनी हजारो कोटींचा घोटाळा केल्याचे सीबीआयने तपासात उघड केले. 2011 मध्ये अवैध खाणकाम आणि भ्रष्टाचार प्रकरणी रेड्डींना अटक झाली.
न्यायमूर्तींना लाच देण्याचा प्रयत्न
तुरुंगात असतानाही जनार्दन रेड्डी यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. रेड्डी चार वर्षे तुरुंगात होते. 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अटी-शर्तींसह रेड्डी यांना जामीन दिला होता. देशाबाहेर जाणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List