पंतप्रधान झालात तरी चुलत्याला विसरू नका! वहिनी शर्मिला पवार यांचा अजित पवारांना उपरोधिक टोला
बारामतीतून लोकसभेसाठी उभ्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेसाठी आता अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार मैदानात उतरल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील उद्धट गावात कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना त्यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘तू काहीही हो, तू सरपंच हो, पंतप्रधान हो, प्रेसिडेंट हो, तू काहीही हो, पण शेवटी वडील ते वडील आणि चुलता तो चुलता. त्यांना योग्य तो मान सन्मान आपण प्रत्येकाने दिलाच पाहिजे. काहीही झाले तरी चुलत्याला विसरता कामा नये. चुलत्याच्या पुढे जाता कामा नये, असा उपरोधिक टोला शर्मिला पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी नाराजी व्यक्त करत अजित पवार यांनी घेतलेला निर्णय पटला नसल्याची खंत बोलून दाखवली होती. वहिनी शर्मिला पवार यांनी देखील सुप्रिया यांच्या प्रचाराला सुरुवात केली. शर्मिला पवार म्हणाल्या, सुप्रिया यांच्या पाठिशी वडिलांची पुण्याई आहे. परंतु त्यांनी कधीच पवार नावाचा वापर केला नाही. त्यांना निवडून द्यायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. आज काय घडतंय हे प्रत्येकाला माहितेय. आज आपण मुखामध्ये श्रीराम म्हणतो. पण, घराघरात काय चालू आहे, हे सर्वांना माहित आहे. सुप्रिया सुळे कोण आहेत, त्यांचं काम काय, त्यांच्याबरोबर काम करणारी लोक कोण आहेत, हे तुम्हाला माहितेय. त्यामुळे त्या लेकीला, माहेरवाशिणीला पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी विनंती शर्मिला पवार यांनी केली.
दुसरीकडे बटन दाबलं तर
संसदेत जाऊन तुम्हाला बोलावंच लागतं. समस्या मुद्देसूद मांडाव्या लागतात. ते काम चांगलं करतायत त्यांना निवडून आणणं आपलं काम आहे. साहेबांनी आपल्याला काही त्रास दिलाय का. त्यांनी आपल्यावर इतके वर्षे प्रेमच केल आहे. एकही निवडणूक हरलेले नाहीत, आता त्या व्यक्तीला हरवायचं का? ते पाप आपण घडवायचं का? दुसरीकडे बटन दाबलं तर आपल्याला चैन पडेल का? एकदा निर्णय घेतला की घेतला’, असंही त्या म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List