अरुणाचल प्रदेशवर पुन्हा चीनचा दावा
अरुणाचल प्रदेशवर चीन करत असलेला दावा मूर्खपणाचा आणि हास्यास्पद असल्याचे म्हणत हिंदुस्थानने चीनला सुनावले असताना सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते लिन जियान यांनी पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवर दावा केला.
चीन वारंवार करत असलेले दावे शनिवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टपणे फेटाळून लावताना हे सीमावर्ती राज्य हिंदुस्थानचा नैसर्गिक भाग असल्याचा पुनरुच्चार केला होता. चीनचे दावे हास्यास्पद आहेत, असे जयशंकर यांनी अरुणाचल मुद्दय़ावर व्याख्यान दिल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते.
एका महिन्यात चौथ्यांदा दावा
या महिन्यात चौथ्यांदा चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला हक्क सांगितला आहे. अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचा दावा चीनच्या संरक्षण प्रवक्त्यानेही अलीकडेच केला होता. हा दावा परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवडय़ात फेटाळून लावला होता.
– जयशंकर यांनी केलेल्या स्पष्टोक्तीबद्दल विचारले असता लीन म्हणाले की, आमची यासंदर्भातील भूमिका खूप स्पष्ट आहे. उभय देशांमधील सीमाप्रश्नी होणाऱया चर्चेत हा मुद्दा असेल.
– दोन्ही देशांमधील सीमा कधीच पूर्णपणे निश्चित झालेली नाही आणि अरुणाचलवर हिंदुस्थानने बेकायदा कब्जा करण्यापूर्वी तो नेहमीच चीनचा भूभाग होता, असे जुनेच तुणतुणे त्यांनी वाजवले.
आद्योगिक स्तरावर पाकिस्तानचा दहशतवाद
पाकिस्तानने सातत्याने दहशतवादाला प्रोत्साहन दिले आहे. आता औद्योगिक स्तरावरही दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. त्यामुळे या नव्या धोक्याचा सामना करण्यासाठी एक नवी पद्धत शोधावी लागणार असल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलो आहोत, असे जय शंकर म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List