अमरनाथ यात्रेहून परतत असतानाच महाराष्ट्रातील भाविकाचा राजस्थानमध्ये मृत्यू
अमरनाथ यात्रेहून परतत असतानाच महाराष्ट्रातील भाविकाचा रेल्वे प्रवासात मृत्यू झाला. बाळासाहेब नथु थोरात (45) असे मयत भाविकाचे नाव असून ते पुणे जिल्ह्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. रेल्वेने घरी परतत असतानाच राजस्थानमधील अलवर जंक्शन स्थानकाजवळ थोरात यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. थोरात यांच्या मृत्यूमुळे मंचर गावावर शोककळा पसरली.
बाळासाहेब थोरात हे मंचरमधील उद्योजक होते. अमरनाथ सेवा समितीने 8 जुलै रोजी यात्रेचे आयोजन केले होते. थोरात या भाविकांच्या ग्रुपमधून अमरनाथ यात्रेला गेले होते. अमरनाथ यात्रेनंतर वैष्णोदेवीचे दर्शन घेत हा ग्रुप घरी परतत होता.
हा ग्रुप जम्मूहून जयपूरला ट्रेनने जात होता. प्रवासादरम्यान, ट्रेन अलवर जंक्शनवर पोहोचताच थोरात यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते ट्रेनच्या शौचालयातच कोसळले. अमरनाथ सेवा समितीचे संस्थापक सुरेश घुले यांनी घटनास्थळी सीपीआर केले. रेल्वे गार्ड, टीसी आणि रेल्वे कर्मचारीही तात्काळ मदतीसाठी धावून आले. दुर्दैवाने थोरात यांना वाचवता आले नाही.
अलवर येथील रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर थोरात यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. थोरात यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. थोरात केवळ उद्योजक नव्हते तर समर्पित सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कार्यकर्ते होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List