रोहित पवारांवर गुन्हा दाखल; पोलीस ठाण्यात संतप्त झाल्याची घटना
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. या राड्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांनाच ताब्यात घेतले. यामुळे आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आणि पोलीस स्थानक दणाणून सोडले. यावेळी रोहित पवार यांचा पारा चांगलाच चढला होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
व्हायरल व्हिडीओबाबत रोहित पवार म्हणाले होते की, आम्ही चार तासांपासून नितीन देशमुख यांचा शोध घेत होतो. पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नव्हते. इकडून तिकडे फिरवत होते. आम्ही आधी मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गेलो, तिथून आझाद मैदान पोलीस स्थानकात गेलो. तिथल्या एपीआय यांना काय चालले ते कळत नव्हते. ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. हे लोकप्रतिनिधीसोबत असे वागत असतील तर गरीबांसोबत कसे वागत असतील?आमचे एवढेच मत आहे की, दोन आमदार, एक माजी मंत्री समोर असतानाही पोलीस नीट माहिती देत नव्हते. मग्रुरी दाखवत होते. लोकप्रतिनिधींसोबत असे वागत असतील, हातवारे करून बोलत असतील तर या लोकांनाही कुठेतरी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. कार्यकर्त्याचे टेन्शन होते आणि आवाज वाढला. याला दमदाटी म्हणत असाल तर कार्यकर्त्यासाठी, सामान्य लोकांसाठी पोलीस प्रशासन सहकार्य करत नसेल तर हा आवाज आणि ही स्टाईल शेवटपर्यंत ठेऊ, असेही ते म्हणाले होते.
आता रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List