फोटो, व्हिडीओ डाऊनलोड करताय… सावधान !
सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप हे अॅप असतेच. व्हॉट्सअॅपवर ओळखीच्या व्यक्तीकडून किंवा अनोळखी नंबरवरून येणारे फोटो, व्हिडीओ खातरजमा न करता, ते थेट डाऊनलोड करण्याची सवय अनेकांना आहे. मात्र, हीच सवय तुमचा खिसा रिकामा करू शकते. कारण व्हॉट्सअॅपवर अनोळखी नंबरवरून येणारे फोटो किंवा व्हिडीओ खात्री न करता, डाऊनलोड केल्यास त्यातून तुमचा मोबाईल हॅक करून लाखो रुपयांचा गंडा घातला जाऊ शकतो. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर अनोळखी नंबरवरून येणारे फोटो, व्हिडीओपासून दोन हात लांब राहण्याचा सल्ला सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांत सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, दररोज नवनव्या क्लुप्त्या वापरून सायबर चोरटे नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारत आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमिषाने तर दररोज लाखो, कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देखील यापूर्वी अनेकांना सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नवीन फंडा शोधून काढला आहे. त्यासाठी या सायबर चोरट्यांनी फोटो, व्हिडीओचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. या नव्या पद्धतीत नागरिक अगदी सहज अडकत असून, त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. आधुनिक काळात व्हॉट्सअॅप हे अॅप्लिकेशन न वापरणारी व्यक्ती शोधून सापडणार नाही. आपल्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी, कार्यालयीन कामकाज करण्यासाठी सर्रास व्हॉ ट्सअॅपचा वापर केला जातो. अनेकांना व्हॉट्सअॅ पवर येणारे फोटो, व्हिडीओ हे थेट डाऊनलोड करण्याची सवय असते. मात्र, हीच सवय घातक ठरू शकते. कारण सायबर चोरट्यांनी नागरिकांच्या याच सवयीचा फायदा उचलून त्यांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे.
अशी केली जातेय फसवणूक
नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर अनोळखी नंबरवरून संदेश प्राप्त होत आहेत. यामध्ये अनोळखी व्यक्तींचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर केले जात आहेत. या ‘फोटो किंवा व्हिडीओमधील व्यक्ती हरवली आहे, त्यांना आपण कोठे पाहिले आहे का?,’ अशा आशयाचा संदेशदेखील या फोटो, व्हिडीओसह पाठवला जात आहे. नागरिक कोणतीही खात्री न करता तो फोटो किंवा व्हिडीओ थेट डाऊनलोड करत आहेत. मात्र, या फोटो, व्हिडीओमध्ये एक विशिष्ट कोड टाकलेला असतो. जेव्हा संबंधित व्यक्ती फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड करते, तेव्हा तो कोड अॅक्टिव्हेट होतो. हा कोड अॅक्टिव्हेट झाल्यानंतर सायबर चोरटे संबंधीत मोबाईल हॅक करुन मोबाईलचा अॅक्सेस मिळवत आहेत. मोबाईल हॅक केल्यानंतर संबंधित व्यक्तीची गोपनीय माहिती, ओटीपी, बँकेचे तपशील, यांसह अन्य गोष्टींवर सायबर चोरट्यांचे नियंत्रण येत असून, नंतर लाखो रुपयांची फसवणूक केली जाऊ शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List