चर्चा तर होणार…जेव्हा दोन सख्खे भाऊ एकाच तरुणीशी लग्न करतात; 3 दिवस रंगला सोहळा, अख्ख्या गावानं केली गर्दी
हिंदुस्थान विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याचे, जाती-धर्माचे वेगळे वैशिष्ट्य आहेत. फक्त भाषा, खाद्यपदार्थच नाही तर प्रत्येक राज्याच्या काही विशेष प्रथा, परंपरा, रिती रिवाज आहेत. अनेक रुढी-परंपरांबद्दल आपण ऐकलेले नसते, त्यामुळे त्यासंबंधी अचानक एखादी घटना समोर येते तेव्हा सर्वच चकीत होतात. आताही हिमाचल प्रदेशमधील अशीच एक परंपरा समोर आली आहे. येथे दोन सख्ख्या भावांनी एकाच तरुणीशी लग्न केले. त्यामुळे देशभरात या ‘बहुपतीक’ प्रथेची जोरदार चर्चा आहे.
हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यातील हाटी समाजातील दोन सख्ख्या भावांनी एकाच तरुणीशी लग्न केले. विशेष म्हणजे हे लग्न गुपचूप करण्यात आले नाही, तर अख्ख्या गावासमोर थाटामाटात करण्यात आले. तीन दिवस हा विवाह सोहळा सुरू होता. या लग्नाला अख्खे गाव आले आणि जेवणाच्या पंगती झोडून गेले. यावेळी परंपरेनुसार लोकसंगीत, नृत्य आणि सामूहिक कलाही सादर करण्यात आल्या.
सिरमौर जिल्ह्यातील शिलाई भागात राहणाऱ्या प्रदीप आणि कपिल नेगी या दोन सख्ख्या भावांनी सुनीता चौहान हिच्यासोबत लग्न केले. परस्पर संमतीने हा विवाह करण्यात आला आहे. प्रदीप जलशक्ती विभागामध्ये काम करतो, तर कपील परदेशात नोकरी करतो. मात्र अनेक शतकांपासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवण्यासाठी दोघांनीही एकाच तरुणीशी लग्न केले. या प्रथेला हिमाचल प्रदेशमध्ये ‘जोडीदार’ प्रथा असेही म्हणतात.
हाटी समाजाला तीन वर्षापूर्वी अनुसूचित जाती-जमातीमध्ये स्थान देण्यात आले होते. हा समाज हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सीमेवरील भागात राहतो. या समाजामध्ये ‘बहुपतीक’ प्रथा अनेक शतकांपासून सुरू आहे. येथे दोन सख्खे भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात. गेल्या सहा वर्षात बढाणा गावामध्ये पाच ‘बहुपतीक’ विवाह झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आम्ही संयुक्तपणे हा निर्णय घेतला आणि सार्वजनिकरित्या परंपरेचे पालन केले याचा आम्हाला अभिमान आहे, असे नवविवाहित प्रदीप नेगी म्हणाला. तर दुसरा भाऊ कपिल यानेही यावर मार्मिक प्रतिक्रिया दिली. आम्ही आमच्या पत्नीला एकत्रित कुटुंब म्हणून पाठिंबा, स्थिरता आणि प्रेम देऊ. आमचा पारदर्शकतेवर विश्वास आहे, असे कपिल म्हणाला. तर सुनीता हिने आपण प्रथेचा आदर करत असल्याचे म्हटले. मला या परंपरेची जाणीव होती आणि मी कोणत्याही दबावाशिवाय हा निर्णय घेतल्याचे ती म्हणाली.
काय आहे ही प्रथा?
हिमाचल प्रदेशमधील हाटी समाजात ‘बहुपतीक’ ही परंपरा हजारो वर्षापासून सुरू आहे. येथे एक महिला दोन किंवा अधिक भावांशी लग्न करते. यामुळे वडिलोपार्जित जमिनीचे विभाजन रोखण्यास मदत झाली. तसेच भावांमध्ये एकता वाढवणे, संयुक्त कुटुंब व्यवस्था जतन करणे, जमिनीचे विभाजन टाळणे हा यामागील उद्देश होता, असे हाटी समितीचे सरचिटणीस कुंदन सिंग शास्त्री म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List