अभिप्राय – कोकणची समृद्ध अनुभूती
>> श्रीकांत आंब्रे
कोकणच्या संगमेश्वर तालुक्यात आंबेड खुर्द गावातील बालपणापासूनच्या वास्तव्यातील आठवणींना उजाळा देणारा जे. डी. पराडकर यांचा ‘मंतरलेले दिवस’ हा कथासंग्रह. लेखकाच्या गावच्या घरातील एकत्र कुटुंबातील केवळ माणसांनीच नव्हे, तर निर्जीव वस्तू, गायी-वासरे, म्हशी, कुत्रे, इतकेच काय, आजूबाजूच्या निसर्गातील वृक्षवेली, पानेफुले इत्यादी अनेक गोष्टींनी त्यांच्या लेखणीला सर्वार्थाने बळ दिले, घरातील माणसांची ओढ किती हुरहुर लावते आणि विरह किती वेदनादायी असतो हे त्यांना अनुभवायला मिळाले. घरी येणाऱया अनेक व्यक्तींकडून लेखकाच्या संस्कारक्षम मनाला प्रत्येक वेळी वेगळे काही शिकता आले. आंबेड खुर्दच्या घरी अथवा आजूबाजूला होऊन गेलेल्या काही दिवंगत व्यक्तिमत्त्वांना लेखकाने कधी पाहिलेही नव्हते. मात्र त्यांच्यावर लेखन करण्याची वेळ आली तेव्हा लेखकाने इतरांनी त्या व्यक्तींच्या केलेल्या हुबेहुब वर्णनातून, स्वभावातून त्यांची व्यक्तिचित्रे या कथांमधून जिवंत केली. लेखक स्वतः पत्रकार आणि चित्रकार असल्यामुळे त्यांनी त्याच कौशल्याने आपल्या गावाला आणि तेथील वास्तूला नेटकेपणाने या पुस्तकात सादर केले आहे.
गावच्या घरातील आठवणींचा समृद्ध ठेवा त्यांच्यापाशी असल्यामुळे आणि व्यक्तिचित्रणाचे उत्तम कसब लाभल्यामुळे व्यक्तिचित्रे असोत किंवा एखादा मनाला भिडणारा प्रसंग, ते जसाच्या तसा डोळय़ांसमोर उभा करतात. या पुस्तकामधील शंकरकाका, माई, सायबा, सोमा यांचे चित्रण प्रभावी आहे, तसेच गोठय़ातील गाय, म्हैस, पाळीव कुत्रा यांचीही रेखीव शब्दचित्रे लेखकाने साकार केली आहेत. त्यांनी रेखाटलेली माणसे म्हणजे कोकणातील माणसांचे प्रातिनिधिक चित्रण आहे. लेखकाची सहृदय आणि सूक्ष्म निरीक्षण दृष्टी, परकाया प्रवेशाची लाभलेली किमया, संवेदनाक्षम मन आणि एखाद्या अनुभवाशी एकरूप होऊन त्याचा लेखनाविष्कार करण्याचे त्यांचे सामर्थ्य खरोखरच एक वेगळीच अनुभूती देणारे आहे. लेखकाच्या अनेक आठवणी प्रामुख्याने त्यांच्या बालपणाच्या असल्या तरी ते मंतरलेले दिवस आज जसे लेखकाला जगण्याचे बळ देतात, तसेच वाचकांनाही कोकणची अनुभूती देतील. कथासंग्रहाची मांडणी तसेच हेमंत सावंत यांचे मुखपृष्ठ वेधक आहे.
मंतरलेले दिवस (कथासंग्रह)
लेखक ः जे. डी. पराडकर
प्रकाशक ः चपराक प्रकाशन
पृष्ठे ः 120, मूल्य ः रु. 250/-
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List