5 लढाऊ विमानांचे सत्य काय आहे? देशाला समजायलाच हवे! ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा मोदींना सवाल
हिंदुस्थान- पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सातत्याने घेत आहेत. याबाबत त्यांनी अनेकदा दावे केले आहेत. मात्र, मोदी सरकार याबाबत काहीही बोलत नसून मौन पाळत आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. मोदींनी याबाबत त्यांचे मित्र ट्रम्प यांना समज देण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. मात्र, सरकारने काहीही केले नाही. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान- पाकिस्तान युद्धाबाबत केलेल्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या दाव्याचा संदर्भ घेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही अनेकदा विधाने केलेली आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षासंदर्भात मोठा दावा केला. जम्मू कश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या संघर्षादरम्यान 5 लढाऊ विमाने पाडण्यात आली, असा दावा ट्रम्प यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
मोदी जी, 5 जहाज़ों का सच क्या है?
देश को जानने का हक है! pic.twitter.com/mQeaGCz4wp
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 19, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारला आहे. 5 लढाऊ विमानांबद्दल नेमकं सत्य काय आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. असा सवाल करत राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. मोदीजी, 5 लढाऊ विमानांबद्दल सत्य काय आहे? देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धादरम्यान पाच विमाने पाडण्यात आली. मे महिन्यात झालेल्या शस्त्रविरामानंतर परिस्थिती शांत झाली असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसमधील काही रिपब्लिकन खासदारांसोबतच्या भोजनादरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केले. ही पाडली गेलेली विमाने हिंदुस्थानची होती की पाकिस्तानची हे मात्र ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही. त्यांच्या या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली असून राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदी यांना सवाल करत उत्तर मागितले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List