भाजपचाच बाप मुंबई तोडणार! संजय राऊत यांचा घणाघात, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाचा खास शैलीत समाचार
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, कुणाचा बाप, बापाचा बाप.. त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राचीच राहील, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या तावातावाने विधिमंडळात केले होते. याला आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी खणखणीत उत्तर दिले. भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे, त्यामुळे ही नाटकी भाषा करू नका, अशा शब्दात राऊत यांनी फडणवीस यांना सुनावले. शनिवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे. त्यामुळे कुणाचा बाप, आजा वगैरे ही नाटकी भाषा करू नका. महाराष्ट्र आणि मराठी ही नाट्यपंढरी आहे. इथे खूप नटसम्राट निर्माण झाले आहेत. रंगमंच हा महाराष्ट्राचाच असल्यामुळे आम्हाला आवेशपूर्ण नाटकातील उतारे वाचून दाखवू नका. कुणाचा बाप, कुणाचा आजा, कुणाचा पणजा… वगैरे. मुंबई तोडण्याचे कारणस्थान हे पहिल्यापासून व्यापाऱ्यांचे आहे आणि ते व्यापारी भारतीय जनता पक्षाचे आहेत. तुम्हाला मुंबईतून फक्त थैल्या हव्या आहेत. पैसे हवे आहेत. संपत्ती हवी आहे. मुंबईला कंगाल करायची आहे आणि सरकार सध्याच्या या सगळ्या लुटमारीला समर्थन देत आहे, असेही राऊत म्हणाले.
फडणवीस काल आपल्या भाषणात म्हणाले की, मुंबई मराठी माणसाची आहे. मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आहे. कसे हे त्यांनी महाराष्ट्राला समजावून सांगावे. तुम्ही ज्या पद्धतीने मराठी भाषेवर हिंदी सक्ती लादताय आणि त्रिभाषा सूत्राचा त्रिवार गजर करताय, अशा पद्धतीने मुंबई मराठी माणासाची होईल? अख्खी मुंबई गौतम अदानी या एका उद्योगपतीच्या हातात देताय. मुंबईचा 7/12 हा तुमच्या लाडक्या उद्योगपतीच्या हातात देताय, यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल? मुंबईचे वीज वितरण आणि वीज बिलाचे कनेक्शन हे सुद्धा तुम्ही गुजरातच्या व्यापाऱ्यांना दिलेले आहे, त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल? मुंबईतला गिरणी कामगार कर्जत, वांगणी, शेलूच्या पुढे फेकला जात आहे, त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल? मुंबईतील मराठी शाळा धडाधड बंद पाडल्या जात आहेत, त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल? मुंबईमध्ये मराठी माणसाची घर घ्यायची ताकद तुम्ही ठेवली नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या मंचावर मराठी माणसाला फसवण्याचे धंदे बंद करा, असा घणाघात राऊत यांनी केला.
दरम्यान, मराठीबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार दुबेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला. मुंबईत येऊन दाखव, तुला इथल्या समुद्रात डुबे डुबेकर मारेंगे, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांचे आव्हान एका दुबेला नाही तर भाजपला आहे. दुबे हा भाजपचा नेता, खासदार आहे. या दुबेचा तीव्र शब्दात निषेध भाजपच्या कोणत्याही नेत्याने केल्याचे मला दिसत नाही.
तुम्ही मराठी, मराठी बोलता आणि एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतोय. महाराष्ट्राला आव्हान देतोय. मराठी माणसाला पटकून, पटकून मारण्याची भाषा करतो आणि शेंदाड शिपाई राज्यकर्ते, मिंधे गटाचे लाचार मान खालू घालून बसले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिले ते फक्त दुबेला नसून हे आव्हान त्यांनी महाराष्ट्र, मुंबईकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्या भाजपला आहे, असे राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List