इंडिया आघाडी म्हणजे फिल्टर कॉफी, काँग्रेस सत्तेत येणार; ‘शॉटगन’ धडाडली
भाजपविरोधात तयार झालेली इंडिया आघाडी म्हणजे फिल्टर कॉफीसारखी आहे. या आधीच्या निवडणुकांचा इतिहास विचारात घेता आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता आहे, असे तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.
सिन्हा म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेली भारत जोडो आणि भारत जोडो न्याय यात्रा या क्रांतिकारी आहेत. त्यामुळे जनतेत जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठा विजय मिळेल आणि काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महत्त्वाची आणि निर्णायक गेमचेंजरची भूमिका बजावतील, असेही सिन्हा म्हणाले.
इंडिया आघाडीत देशभरातील अनेक पक्षांचा समावेश आहे. त्यामुळेच ही आघाडी फिल्टर कॉफीसारखी आहे. आणखी विरोधी पक्ष या आघाडीत सहबागी झाले तर या फिल्टर कॉफीची लज्जत आणखी वाढेल. काँग्रेस हा जुनाजाणता पक्ष असून, तो राष्ट्रीय पक्ष आहे हे अमान्य करता येणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपचा निवडणूक रोखे घोटाळा आणि इतर घोटाळे, भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्यासाठी सात टप्प्यातील निवडणुकांची मदत होणार आहे. एनडीएला सीबीआय, ईडी, आयकर यांचा पाठिंबा आहे, तर इंडिया आघाडीच्या पाठीशी जनता उभी आहे. देशाच्या अनेक भागांत इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या आधीचा इतिहास बघता काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List