सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितला स्वत:च्या ट्रोलिंगचा किस्सा; म्हणाले, ‘पाठदुखीमुळे मी फक्त…’
सोशल मीडियाच्या जमान्यात ट्रोलिंग काही नवीन नाही. अगदी पंतप्रधानांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत सर्वांनाच याचा सामना करावा लागतो. याचा अनुभव देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही आला असून कर्नाटकातील बंगळुरू येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वत:च्या ट्रोलिंगचा किस्सा सांगितला.
CJI DY Chandrachud यांनी त्यांच्यासोबत नुकताच घडलेला ट्रोलिंगचा एक किस्सा सांगितला. मलाही ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. पाच दिवसांपूर्वी मी एका प्रकरणाची सुनावणी करत होतो आणि याचे लाईव्ह स्ट्रिमिंगही सोशल मीडियावर सुरू होते. सुनावणीदरम्यान मला पाठदुखीचा त्रास झाला. त्यामुळे मी माझी कोपर खुर्चीवर ठेवली आणि बसण्याची स्थितीही थोडी बदलली. माझ्या या कृतीमुळे मला ट्रोल करण्यात येऊ लागले. सरन्यायाधीश किती अहंकारी आहेत, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ट्रोल करणाऱ्यांनी हे सांगितले नाही मी कोणत्या परिस्थितीत असे केले. 24 वर्ष न्यायदानासारख्या क्षेत्रामध्ये करत राहणे थोडे कठीण आहे. मी ते करतोय. पण मी न्यायदानाची भूमिका सोडली नाही, तर फक्त बसण्याच्या स्थितीत थोडा बदल केला. परंतु यावरूनही मला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. परंतु आमच्या खांद्यावर जबाबदारी असून अंतिम न्याय इथेल मिळेल असा सामान्य नागरिकांचा विश्वास आहे.
सरन्यायाधीशांनी उल्लेख केलेला किस्सा घडला कधी?
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उल्लेख केलेला किस्सा 19 मार्च रोजी घडला. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. याचे लाईव्ह स्ट्रिमिंगही सुरू होते. यादरम्यान महाधिवक्ते बाजू मांडत असताना सरन्यायाधीश आपल्या बसण्याची स्थिती थोडी बदलतात. याचा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांना ट्रोल केले गेले.
अनेकदा वकील शब्दांची मर्यादा ओलांडतात
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असताना मी सातत्याने ऐकायचो की कनिष्ठ स्तरावरील न्यायाधीशांसोबत कसा व्यवहार व्हायचा. अनेकदा वकील न्यायालयामध्ये युक्तीवाद करताना मार्यदा ओलांडतात. सरन्यायाधीश या नात्याने मी अनेक वकील आणि वादी-प्रतिवादी जेव्हा आमच्याशी न्यायालयात बोलतात तेव्हा हे पाहिजे आहे. जेव्हा ते शब्दांची मर्यांदा ओलांडतात तेव्हा त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमान केल्याचा खटला दाखल करावा असे नाही. न्यायाधीश आणि न्यायमूर्ती म्हणून आपणही त्यांना समजून घेतले पाहिजे. ते देखील तणावातून जात असतात, असेही सरन्यायाधीश म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List