मोनेगिरी – ‘कल्पना’च्या पलीकडलं!

मोनेगिरी – ‘कल्पना’च्या पलीकडलं!

>> संजय मोने

सगळ्यांना एका रेषेत जगणारं आयुष्य नाही मिळत. असं आयुष्य लाभलेली कल्पना साखळकर. कल्पनाचं नाव आणि आडनाव याच्या मधली पालकांच्या नावाची जागा रिकामी होती. मात्र ज्यांच्यामुळे साखळकर हे आडनाव मिळालं त्यांची आणि तिची भेट नियतीने अजूनही घडवलेली नाही

ल्पना साखळकर हे तिचं नाव. वडील किंवा आईचं नाव जे आपल्या सगळ्यांच्या नावाच्या मधोमध असतं तसं कल्पनाचं नाव आणि आडनाव याच्या मधली पालकांच्या नावाची जागा रिकामी होती. कोणाचंच नाव नव्हतं तिथे. माझ्या मित्राच्या पुतण्याच्या शाळेत होती ती. म्हणजे वयाने आमच्यापेक्षा चांगली 12-17 वर्षांनी लहान. त्या काळात तिच्या नावाच्या मधल्या रिकाम्या जागेवरून बरोबरचे विद्यार्थी तिला खोदून खोदून अनेक प्रश्न विचारायचे.

“कल्पना! तुला आई वडील नाहीत का?”

“कोणीच नाही असं कसं होईल? आई तर असेल किंवा वडील तरी.”

“तुझी पुस्तकं, वह्या, इतर गोष्टी, तुझी फी कोण भरतं?”

या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरं ती अजिबात द्यायची नाही. नुसतं हसून टाळायची. पुढे मग सगळ्यांच्या लक्षात आलं की, कल्पनाकडे यावर काहीच उत्तर नाही. शिवाय कल्पना स्वभावाने अत्यंत चांगली होती. अडचणीत आणणारे प्रश्न विचारणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींना तिने कधीच उलट उत्तर दिलं नाही वा कधी त्यांचा राग राग केला नाही. अतिशय हुशार होती ती आणि इतरांच्या सगळ्या अडचणीच्या वेळेला न विचारता ती धावून यायची. त्यामुळे ती सगळ्यांची लाडकी होती. आपल्या नावापुढे पालकांचं नाव नाही याचा न्यूनगंडही तिला नव्हता. त्यामुळे मग इतर सहकाऱ्यांनी तिला कधीच कुठले प्रश्न विचारले नाहीत. ती कुठे राहायची? हा प्रश्न मात्र सगळ्यांना होता.

“जरा धीर धरा. शाळेतून कॉलेजात जायच्या आधी याचा खुलासा मी नक्की करेन.”

…आणि सगळ्यांनी खरोखरच धीर धरला होता. दहावीची परीक्षा झाली. निकाल हातात आले. कल्पना शाळेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्कृष्ट गुण मिळाले होते. ती बोर्डाच्या नंबरात आली होती. शाळा आता सगळ्यांचीच सुटणार होती. सगळेजण सेंडऑफसाठी जमले. शाळेने तिचा आणि इतर गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार केला. उत्तर म्हणून सगळ्यांनी थोडंसं भाषण वगैरेही केलं. सगळ्यांनी कल्पनाच्या नावाचा पुकारा केला आणि तिने बोललंच पाहिजे म्हणून आग्रह केला. शाळेतले शिक्षक आणि शिक्षिका यांनीही आग्रह केला. मुख्याध्यापक म्हणाले, “आजपर्यंत कल्पनाने कोणालाही काहीही उत्तर दिलं नाही, आलेल्या प्रश्नांना हसून टाळलं. मला याबाबतीत अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलंय. तेव्हा मी कल्पनाला विनंती करतो की, तिने सत्काराला उत्तर द्यावं.”

शेवटी सगळ्यांच्या आग्रहापुढे तिचा नाइलाज झाला आणि ती भाषणाला म्हणजे उत्तर द्यायला उभी राहिली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही आजवर विचारल्या गेलेल्या आणि हसून टाळल्या गेलेल्या सगळ्या प्रश्नांना तिला उत्तरं द्यायची होती.

“माझं नाव कल्पना साखळकर. फक्त कल्पना साखळकर. आई आणि वडील यांची नावं मला माहीत नाहीत. आडनावसुद्धा माझं स्वतचं नाही. मी जिथे राहते तिथे अनेक मुलं आणि मुली राहतात. ते तिथे त्यांना त्यांच्या पालकांनी सोडून दिलेलं असतं म्हणून येतात. आमच्या सगळ्यांच्या घराबाहेर एक पाळणा आहे. त्यात आम्हाला कोणी ना कोणीतरी सोडून जातं. पुढे आमचं काय झालंय हे बघायला सोडाच, पण साधी विचारपूस करायलाही कोणी येत नाही. नाही म्हणायला कधीतरी एखादा फोन येतो (तेव्हा मोबाइल नव्हते). समोरची व्यक्ती दिसत नाही, पण ते आडून आडून चौकशी करतात. काय झालं त्या अमुक तमुक मुलाचं किंवा मुलीचं? या छापाचे फोन असतात. आमच्या घरच्या भिडे बाई, आम्ही त्यांना बाईच म्हणतो. कारण त्यांनीच आम्हाला सांगितलं आहे की, मला आई म्हणू नका. कारण ‘आई’ या शब्दाचा अर्थ तुमच्यासाठी फार वाईट आहे. जी तुम्हाला टाकून गेली ती आई. आम्हाला असं सोडून देण्याची कारणं बरीच आहेत. आता आपण सगळेच वयाने मोठे आहोत. त्यामुळे सांगायला हरकत नाही. चोरट्या प्रेमप्रसंगातून आमच्यातल्या खूप जणांचा जन्म झालेला असतो. त्यातल्या त्यात गळ्याला नख लावून आमचा जगण्याचा हक्क हिरावून घेण्यापेक्षा किंवा कचऱ्याच्या पेटीत टाकून आम्हाला मरणाच्या हवाली करण्यापेक्षा हे बरं आहे. आमच्या घरात… मी घरात मुद्दाम म्हणते आहे. कारण जिथे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा मिळतो आणि सगळी काळजी घेतली जाते ते आमच्यासाठी घरच असतं. आमच्या भिडे बाई हे आमचे सगळे खर्च निभावून नेतात आणि ते सोपं काम नाही. आमच्या घरात आज साधारण वीस जण आहेत. काही मुलगे, काही मुली. तो खर्च भागवता यावा म्हणून त्या अक्षरश दारोदार फिरत असतात. त्यांच्या घरची परिस्थिती उत्तम आहे, पण वीस जणांचा खर्च निघेल इतकी निश्चित नाही, पण जसे टाकून जाणारे पालक आहेत तसेच सांभाळ करायला मदत करणारेही आहेत. जे आम्हाला टाकून गेले त्यांचा माझ्या मनात बिलकुल आकस किंवा राग नाही. आत्यंतिक नाईलाज म्हणूनच आम्ही सगळे या घरात आलोय. दुसरं कारण म्हणजे आर्थिक असहाय्यतेमुळे काही जणांना असं दुर्दैवी पाऊल उचलावं लागतं. मला निदान ‘साखळकर’ असं आडनाव तरी आहे, तेही एका दयाळू जोडप्यामुळे मिळालं आहे. साखळकर पती-पत्नी अतिशय छोट्याशा घरात राहत होते. मला माझ्या पालकांनी पाळण्यात ठेवलं आणि ते निघून गेले. त्याच सुमारास आमच्या घराच्या जवळून ते जात होते. मला पाळण्यात टाकलेलं पाहून ते दोघेही मला उचलून भिडे बाईंकडे आले.

“बाई! आम्ही फार लहान घरात राहतो. त्यामुळे अजून एक बाळ घेऊन जाणं आम्हाला शक्य नाही, परंतु हिचा सगळा खर्च आम्ही करू आणि आमचं नावही तिला लावू.”

भिडे बाईंनी मला ठेवून घेतलं. आजपर्यंत साखळकर माझा सर्व खर्च करत होते. बाईंनी अर्थात आमची भेट कधीच करवून दिली नाही, पण माझ्या वाढदिवशी – अर्थात मी त्यांना सापडले तो दिवस, त्या दिवशी त्यांच्याकडून मला कायम काही ना काहीतरी भेट येते. आजही मी त्यांना पाहिलेलं नाही. बास! अजून काही नाही. आजही ते आले असतील तर मला माहीत नाही.”

 हे सगळं कल्पना शांतपणे सांगत होती. बाकी सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. ही हकीकत माझ्या मित्राच्या पुतण्याने मित्राच्या घरी गेलो होतो तेव्हा सांगितली. मी थक्क झालो. पुढे मग सगळं विसरूनही गेलो. अनेक वर्षांनी मी एका नाटकाच्या प्रयोगाला गेलो तेव्हा प्रमुख पाहुणी म्हणून ‘कल्पना साखळकर’ असं नाव वाचलं. अनेक वर्षांपूर्वीची कहाणी डोळ्यांसमोर उभी राहिली. कार्यक्रम संपल्यावर मी कल्पनाला भेटलो. ऐकलेलं सगळं सांगितलं.

आता कल्पना कलेक्टर झाली होती. सगळं ऐकल्यावर शांतपणे ती म्हणाली, “सगळ्यांना एका रेषेत जगणारं आयुष्य नाही मिळत. मध्यंतरी भिडे बाई वारल्या. तेव्हा मी बाहेरगावी होते. आजही साखळकर कोण होते हे मला कळलेलं नाही. सरकारी नोकरीत होते इतकं कळलं होतं. माझ्या पदाचा वापर करून त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना एकदा भेटता आलं पाहिजे इतकाच माझा हट्ट आहे. बघू या! तुम्ही कधी, उद्या निघणार का?”

“हो, सकाळी लवकर.”

“काही लागलं, कसलीही मदत, तर मला कळवा.”

असं म्हणून त्या सरकारी गाडीतून निघून गेल्या. त्या मला मदत करतील अगदी नक्की, पण ‘साखळकर’ शोधण्यात मी त्यांना मदत करू शकेन का?

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;