कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला हिंदुस्थानात आणलं, मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी
कुख्यात गँगस्टर छोटा राजन, अबू सालेम,रवी पुजारी यांच्या नंतर आता गँगस्टर प्रसाद पुजारीला हिंदुस्थानात आणण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. गेल्या 20 वर्षांत विविध गंभीर गुन्हे करून परदेशात लपून राहणारा व तेथूनही गँग चालविणार्या प्रसाद पुजारीला अखेर मुंबई गुन्हे शाखेने फरफटत मुंबईत आणले. चीन मधून त्याचे प्रर्त्यापण करण्यात आलेय
हत्या, हत्येचा प्रयत्न, ठार मारण्याच्या धमकीसह खंडणीची मागणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद प्रसाद पुजारी याच्या नावावर विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. मुळचा कर्नाटकच्या उडीपीचा असलेला मात्र वाशी मग विक्रोळी येथे बस्तान मांडणारा प्रसाद हा एका गुन्ह्यात अटक होऊन 2004 मध्ये जामीनावर बाहेर आला आणि 2005 मध्ये तो हिंदुस्थानाबाहेर सटकला.राजकीय नेते, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, बॉलिवूड कलावंत यांना खंडणीसाठी धमकावणे, खंडणी न दिल्यास गोळीबार करणे असे गुन्हेगारी कृत्य प्रसाद पुजारी व त्याच्या टोळीकडून घडत होते. परदेशात राहूनही त्याचा उपद्रव काही थांबत नव्हता. त्यामुळे मुंबई पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. तो चीन, हाँगकाँग या देशांमध्ये लपून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वर्ष 2012 मध्ये त्याच्याविरोधात पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
दरम्यान, गेल्या वर्षी चीनमध्ये तो पकडला गेल्यानंतर त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्याला चीनमधून आज पहाटे मुंबईत आणण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश मिळाले. विक्रोळी येथे 2019 मध्ये एका राजकीय नेता व व्यावसायिकावर खंडणी न दिल्यामुळे गोळीबार केल्याप्रकरणात खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक केली आहे. अटकेनंतर पुजारीला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रसाद पुजारी हातात आल्याने आता त्याच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची उकल होईल व त्याच्यार कठोर कारवाई करण्यात येईल. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षात त्याच्या विरोधात पाच तर युनीट-7 मध्ये तीन गुन्ह्यांची नोंद असल्याचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांनी सांगितले.
सुरुवातीला कुमार पिल्ले, मग छोटा राजन, नंतर स्वतः ची टोळी
90 च्या दशकात प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी उर्फ सिद्धार्थ शेट्टी उर्फ सिद्धु उर्फ सिद उर्फ जॉनी हा गुन्हेगारी विश्वास आला. सुरुवातीला तो कुमार पिल्ले गँगसाठी काम करू लागला. त्याच्यापासून फारकत घेत मग तो छोटा राजन साठी काम करू लागला. गुन्हेगारी विश्वात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी त्याने छोटा राजनला सोडून स्वतः ची टोळी सुरू केली.आपल्या पंटर लोकांच्या मदतीने त्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील राजकीय नेते, बांधकाम व्यावसायिक, प्रतिष्ठित व्यक्ती, बॉलिवूड कलाकार यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. आपली दशहत निर्माण करण्यासाठी तो वाटेल त्या थराला गेला. पण अखेर मुंबई गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केले.
परदेशातून गँग चालवायचा
2005 मध्ये प्रसाद पुजारी हिंदुस्थानाबाहेर सटकला. त्याने परदेशात आश्रय घेतला आणि तेथून त्याने आपले गुन्हेगारी कृत्य पंटर लोकांच्या सहाय्याने सुरुच ठेवले. चीनमध्ये राहता यावे यासाठी प्रसादने तेथील तरुणीची विवाह केला. 10 वर्षे तो तेथे राहिला.आता आपण सुरक्षित झालो अशा भ्रमात तो होता. गुन्हेगारी कृत्य करण्याबरोबर तो आजुबाजूच्या देशांमध्ये ये जा करत होतो. परंतू त्याचा खेळ अखेर संपला
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List