कत्तलीसाठी मेट्रोच्या कंत्राटदाराने झाडांचा बनवला बोगस ‘जन्म दाखला’; वय वर्षे चार सांगून 15 वर्षांच्या मोठ्या वृक्षांवर कुऱ्हाड
पर्यावरणप्रेमींचा आवाज दाबून भाईंदर पश्चिमेत मेट्रो कारशेडसाठी तब्बल १२ हजार ४०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. मात्र एमएमआरडीएच्या कंत्राटदाराने पैसे वाचवण्यासाठी झाडांच्या सर्वेक्षण अहवालात मोठा झोल केल्याचे समोर आले असून १५ वर्षांची मोठी झाडे चक्क चार ते पाच वर्षांची दाखवली आहेत. इतकेच नाही तर झाडांच्या संख्येतही गंडवागंडवी करून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याचा डाव आहे. त्यामुळे झाडांच्या जन्माचा बोगस दाखला बनवणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारतानाच फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे.
भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथील जागेत मेट्रो कारशेड उभारण्यात येणार आहे. कारशेड उभारण्यासाठी सुभाषचंद्र बोस मैदान मेट्रो स्थानक हे शेवटचे स्थानक आहे. या स्थानकालाच लागून मीरा इस्टेट (डीबी रिअॅलिटी), राधास्वामी सत्संग व अन्य विकासकांच्या मोकळ्या जागा, लगत मोकळी मिठागरे व लागून राई मुर्धा मोरवा गावामागे प्रचंड मोकळ्या जागा पडीक आहेत. अनेक संस्था, पक्ष, संघटना आणि २१ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सह्या करून डोंगरावरील झाडे तोडण्यास विरोध केला आहे. मात्र बिल्डरच्या फायद्यासाठी डोंगरावर कारशेड उभारण्याचा घाट घातला आहे.
कंत्राटदाराच्या चालूगिरीबाबत महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना माहिती मिळताच त्यांनी उपायुक्त कल्पिता पिंपळे यांना झाडे तोडण्यास स्थगिती द्या असे आदेश दिले. संबंधित ठेकेदाराने डोंगरी येथील चारोळी, ताड, जांभूळ, आंबा, मोह व अन्य नैसर्गिक झाडे तोडली आहेत. उद्यान अधीक्षक हितेश राठोड यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिकांनी स्थळ पाहणी केली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी कंत्राटदार हा झाडांचा क्रमांक टाकलेल्या संख्येपेक्षा जास्त झाडे तोडत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
यावेळी माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक बर्नड डिमेलो, डोंगरी गाव पंच मंडळाचे सचिव क्लेटस नुनीस व ग्रामस्थ, पालखाडी गाव मंडळाचे अध्यक्ष जॉन मेंडोन्सा, धीरज परब, सत्यकाम फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. कृष्णा गुप्ता आदी उपस्थित होते.
परवानगी न घेताच रस्ता बनवला
डोंगर खोदून कच्चा रस्ता बनवला असून त्यासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता झाडे तोडली असल्याचे निदर्शनास आले. एमएमआरडीए ठेकेदाराने दिलेल्या अहवालात झाडांचे वय खूप कमी दाखवले आहे. २०१३ सालापासूनची गुगल अर्थ सॅटेलाईट छ्याचित्राद्वारे आणि प्रत्यक्ष झाडांचे खोड (बुंदे) यांच्या आकाराद्वारे हे निदर्शनास आले. झाडांचे वय ठेकेदाराच्या अहवालात केवळ चार ते पाच वर्षे नाममात्र दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात या झाडांचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे पाहणीत लक्षात आले आहे. झाडांची संख्या व वय कमी दाखवल्यामुळे महापालिकेला कमी पैसे भरावे लागतील यामुळेच असा प्रकार केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला आहे.
उद्यान विभाग झाडांची स्थळ पाहणी करत असून त्याचा अहवाल तयार करून तो प्रशासनाला सादर केला जाईल, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
– कल्पिता पिंपळे (उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List