उंच ‘पीओपी’ गणेशमूर्ती समुद्रात विसर्जनास तूर्त बंदीच, अनिल काकोडकर समितीच्या अहवालात शिफारस
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) उंच गणेशमूर्ती तलाव, नद्या आणि समुद्रात विसर्जित करण्यास तूर्त मनाईच करण्यात आली आहे. गणेशोत्सवात भव्य मूर्तींची परंपरा कायम राखायची असेल, तर पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध पर्याय शोधणे अपरिहार्य ठरणार आहे, असा ठळक निष्कर्ष विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने आपल्या अहवालात नोंदवला आहे.
पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागविला होता. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी हा अहवाल दिला असून त्यात काही शिफारशी करण्यात आल्या आहेत.
अहवालातील निष्कर्ष व शिफारशी…
– गणेशोत्सवात भव्य मूर्तींची परंपरा कायम राखायची असेल तर पर्यावरणपूरक व नियोजनबद्ध पर्याय शोधणे अपरिहार्य आहे.
– उंच मूर्तींचे विसर्जन विशाल पाणवठय़ात किंवा खोल समुद्रात आणि वाहत्या नद्यांच्या विसर्गाच्या बाजूला सुरक्षित अंतरावर पिण्यासाठी वापरण्यात येणाऱया पाण्यापासून दूर अशा ठिकाणी करणे शक्य आहे. पण त्यासाठी अजून सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. तो पूर्ण होईपर्यंत तात्पुरते पर्यावरणस्नेही उपाय योजावेत.
– पीओपी मूर्ती विसर्जनामुळे होणाऱया प्रदूषणाचे प्रमाण, पाण्याचा साठा, मूर्तींची संख्या आणि त्यांची रचना यावर विसर्जनाचे परिणाम ठरतात. त्यावर सखोल अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागेल.
– पीओपी मूर्तींच्या विसर्जनानंतर तयार होणाऱया गाळाचा पुनर्वापर करण्यासंदर्भात आयोगाने स्वतंत्र अभ्यास प्रकल्प सुरू केला आहे. तो पूर्ण होईपर्यंत गाळ स्वतंत्रपणे साठवण्याची व्यवस्था करावी.
– गाळाच्या पुनर्वापरासाठी विशिष्ट कार्यपद्धती (एसओपी) तयार केल्या जातील.
मूर्तींसाठी नैसर्गिक रंगच वापरावेत
गणेशमूर्ती रंगवण्यासाठी प्रदूषण करणाऱया रासायनिक आणि धातूयुक्त रंगांच्या वापरावर बंदी घालावी.
नैसर्गिक व पर्यावरणस्नेही रंगांचाच मूर्तींसाठी वापर करावा.
नैसर्गिक रंग कुठे उपलब्ध होतील याबाबत मूर्तीकारांना माहिती दिली जावी.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List