Dhaba Style Dal Fry – ढाब्यावरची खमंग डाळ फ्राय करा आता घरच्या घरी.. रेसिपी आणि सोबतीला उपयुक्त टिप्स
ढाब्यावरील पदार्थांची चव म्हणजे अवर्णनीय असते. एखादा खास ढाबा किंवा खास हाॅटेल त्या ठिकाणची चव ही आपली फेवरेट असते. ढाब्यावर गेल्यावर आजही अनेकजण न विसरता मागवतात तो पदार्थ म्हणजे जिरा राईस आणि डाळ फ्राय… ढाबा स्टाईल डाळ फ्राय करण्याची त्यांची स्वतःची एक अनोखी पद्धत असते. पण आता तुम्ही ही चव घरबसल्या चाखु शकता. ढाबा स्टाईल डाळ फ्राय करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर दूरवर ढाब्यावर जाण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी सेम ती चव चाखु शकता.
ढाबा स्टाईल डाळ फ्राय
साहित्य
तुरीची डाळ- 1 कप
पाणी: 2.5 कप
हळद पावडर: 1/2 टीस्पून
मीठ: चवीनुसार
तूप किंवा बटर: 2 टेबलस्पून
जिरे: 1 टीस्पून
लसूण: 4-5 पाकळ्या (चिरलेल्या)
आले: 1 इंचाचा तुकडा (किसलेला)
हिरव्या मिरच्या: 2 (बारीक चिरलेल्या)
कांदा: 1 मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)
टोमॅटो: 2 (बारीक चिरलेला)
धणे पावडर: 1 टीस्पून
लाल मिरची पावडर: 1/2 टीस्पून
गरम मसाला: 1/4 टीस्पून
कसुरी मेथी: 1 टीस्पून
कोथिंबीर
कृती-
सर्वात आधी तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. डाळ शिजवताना त्यामध्ये किंचीत तेल घालावे. तसेच चिमूटभर हिंगही घालावा.
डाळ शिजल्यानंतर, कुकर थंड झाल्यानंतर डाळ व्यवस्थित घोटून घ्यावी.
डाळ फ्रायमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती फोडणी
फोडणीसाठी एका पॅनमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर घ्यावे. त्यामध्ये जिरे घालावे, जिरे चांगले तडतडल्यानंतर, नंतर लसूण, आले आणि हिरव्या मिरच्या घालावे. हे सर्व सोनेरी रंगाचे झाल्यावर, त्यात चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी परतून घ्यावा.
Sweet Dish- अवघ्या दहा मिनिटांमध्ये बनवा घरीच्या घरी साॅफ्ट गुलाबजाम
कांदा गुलाबी झाल्यानंतर, चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो मऊ झाल्यानंतर आता त्यात धणे पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ असे मसाले घाला. टोमॅटो मऊ झाल्यानंतर, तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले परतून घ्यावेत.
यानंतर टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर, लगेच शिजवलेली डाळ घालावी. डाळ व्यवस्थित मिक्स करून, किमान पाच ते सात मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावी. जेणेकरून सर्व मसाले डाळीमध्ये चांगले मिक्स होतील. या डाळीमध्ये शेवटी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालावी. डाळ फ्राय तयार झाली.
Monsoon Soup Recipe – मस्त गरमागरम चिली गार्लिक सूप, फक्त दहा मिनिटांत होईल तयार!
टिप्स
डाळ फ्रायसाठी डाळींची निवड करताना, मिक्स डाळींची निवड करु शकता. यामध्ये चणाडाळ, मूगडाळ, उडीद डाळ, मसूर डाळ अशा डाळींची निवड करु शकता. जेणेकरून सर्व प्रकारच्या डाळी आपल्या आहारामध्ये समाविष्ट होतील.
डाळ फ्राय करताना, डाळ उकडण्यासाठी कूकर हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु उत्तम चव हवी असल्यास आणि शक्य असल्यास चुलीवर किंवा मडक्याच्या भांड्यात डाळ शिजवा. त्याची चव अप्रतिम लागते.
डाळ शिजवताना कायम किमान एक चमचाभर तेल किंवा तूप घालावे. यामुळे डाळ चांगली शिजून आणि मिळून येते.
डाळ शिजवताना एक चिमूट हिंग घातल्याने, डाळीची चव अधिकपटीने वाढते.
पूर्ण डाळ फ्राय तयार झाल्यानंतर, कोळश्याचा स्मोक दिल्यास या डाळीची चव अधिक पटीने वाढते.
ही साधी सोपी रेसिपी नक्की करुन बघा, घरच्या घरी मिळेल ढाब्यासारखी अप्रतिम डाळ फ्रायची चव.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List