सीटवरून वाद झालेला विकोपाला गेला, धावत्या ट्रेनमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
सीटवरून झालेल्या वादातून धावत्या ट्रेनमध्ये एका 39 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दीपक यादव असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जीआरपीने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. राहुल, संजीव, विशाल, प्रियांशू आणि सिद्धार्थ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. दीपक यादव हा दिल्लीत नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे तो दिल्ली-सहारनपूर पॅसेंजर ट्रेनने घरी परतत होता. यादरम्यान त्याचा आरोपींशी सीटवरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि पाचही जणांनी दीपकला बेदम मारहाण केली. या मारहाणीत दीपक गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपींनी दीपकला बेशुद्धावस्थेत रेल्वेस्थानकावर फेकून तेथून पळ काढला.
रेल्वेस्थानकावरील नागरिकांनी दीपकला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपींचा कसून शोध घेत पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List