मोदी सरकार आल्यापासून देशाला परराष्ट्र धोरणच नाही, संजय राऊत यांचा घणाघात
ट्रम्पकडून हिंदुस्थानला मुर्ख बनवलं जात आहे. यात पंतप्रधान मोदींची कुठलीच भूमिका नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मोदी सरकार आल्यापासून देशाला परराष्ट्र धोरणच नाही असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, इराण आणि इस्रायलचं भांडण सुरू आहे मग अमेरिकेने त्यात उडी का घेतली? जेव्हा हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू होता तेव्हा ट्रम्प यांनी युद्ध थांबवलं. आणि युद्ध थांबवण्याचं श्रेय घेतलं. त्यांना जगात शांतता हवी आहे. त्यांना नोबेल पुरस्कार पाहिजे आणि यासाठी पाकिस्ताने सैन्यप्रमुख जनरल मुनीर यांना जेवण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. इराणकडे अण्वस्त्र आहेत. हे सांगून तुम्ही इस्रायलच्या बाजूने उभे राहिले आणि इराणवर हल्ला केला. पण ट्रम्प आमच्या बाजूने का उभे नाही राहिले? याचा विचार पंतप्रधान मोदींनी केला पाहिचे. ट्रम्पकडून हिंदुस्थानला मुर्ख बनवलं जात आहे. यात पंतप्रधान मोदींची कुठलीच भूमिका नाही. या सरकारकडे कुठलेही परराष्ट्र धोरण नाही. फक्त जगभर फिरायचं, टाळ्या वाजवायच्या, कॅनडात जाऊन फोटो काढायचे. 10 वर्षात पहिल्यांदाच या सरकारकडे कुठलेही परराष्ट्र धोरण नाही. पाकिस्तानविरोधात आपण जिंकत होतो पण आपल्याला थांबवलं आणि हेच ट्रम्प इस्रायलसोबत उभे आहेत आणि इराणवर हल्ले करत आहेत. ट्रम्प यांना मोदींबद्दल आत्मीयता नाही, ट्रम्प यांना हिंदुस्थानाशी मतभेद नाहीत. पण अमेरिका आणि ट्रम्पला हिंदुस्थानचे हे सरकार नकोय असं दिसतंय असे संजय राऊत म्हणाले.
परराष्ट्र धोरणाबाबत देशाला एक भूमिका असायला हवी. जेव्हापासून मोदी आले आहेत तेव्हापासून आपल्याकडे परराष्ट्र धोरण नाही. फक्त देशाच्या तिजोरीचा पैसा खर्च होतोय, 200 देश फिरून आले आणि त्यात 500 कोटी रुपये खर्च झाले आहेत. रील्स काढले जात आहेत पण परराष्ट्र धोरण काय आहे? इराण आणि इस्रायलच्या युद्धात आमची भूमिका काय आहे? रशिया आणि युक्रेनच्या युद्धात आपली भूमिका काय आहे? हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे युद्ध आम्ही थांबवले हे ट्रम्प सतत सांगत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये जनरल मुनीरला डिनरसाठी बोलावलं यावर पंतप्रधान मोदींची भुमिका काय आहे? पंतप्रधान गप्प का आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
अमित शहांनी हे सांगावं की ज्या चार दहशतवाद्यांनी आपल्या पर्यटकांवर हल्ला केला ते चार दहशतवादी कुठे आहेत? तुम्ही युद्ध का थांबवलं आणि ट्रम्प यांच्या दबावाखाली का थांबवलं? यावर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List