Pandharpur Wari – रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा अनोखा उपक्रम, पहिल्या सायकलवारीला उत्साहात प्रारंभ
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या रत्नागिरी ते पंढरपूर या पहिल्या सायकलवारीला प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरातून प्रारंभ झाला. रिमझिम पावसात सायकलवर भगवा झेंडा फडकवत हरिनामाचा गजर करत, हे सायकलस्वार पंढरपूरला रवाना झाले आहेत.
विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे काकड आरती झाल्यानंतर सायकलस्वारांना देवस्थानतर्फे श्रीफळ, पुष्प व प्रसाद देऊन आणि गाऱ्हाणे घालून आशीर्वाद देण्यात आला. रत्नाकर हेगिष्टे यांनी विठुरायाला गाऱ्हाणे घातले. विठ्ठल मंदिर देवस्थानचे विजय पेडणेकर, प्रमोद रेडीज, वारकरी रवी गुरव यांनी सायकलवारीला झेंडा दाखवला. याप्रसंगी काकड आरतीसाठी नेहमी येणारे भाविक मोहन चंदरकर, चंद्रशेखर घडशी, रोहन शिर्के, उदय डाफळे, रत्नाकर हेगिष्टे, वसुधा शिर्के, स्मिता सनगरे, अक्षया रेडिज आदी उपस्थित होते.
रत्नागिरी ते पंढरपूर हा 300 किलोमीटरचा प्रवास हे सायकल वारकरी दोन दिवसांत पूर्ण करणार आहेत. 22 जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा आणि संमेलन करणार आहेत. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, विशाल भोसले, गजानन भाताडे, नारायण पाटोळे, अमित पोटफोडे, आरती दामले, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे आणि विवेक खानविलकर हे सदस्य वारीमध्ये सहभागी झाले आहेत. सायकलपट्टू मलकापूर, कराड मार्गे उंब्रज येथे मुक्काम करणार आहेत. उद्या सकाळी मायणी, महूदमार्गे पंढरपूरला मुक्काम होईल. 22 जूनला भागवत एकादशीला सायकल रिंगण व सायकल संमेलन होईल. गेल्या चार वर्षांपासून सायकलवारी सुरू आहे. यंदा लातूर सायकल क्लबकडे आयोजनाची जबाबदारी आहे. प्रत्येक वर्षी पंढरपूर सायकल क्लब सर्व सायकलिस्टना सहकार्य करत आहे.
आम्ही या वर्षी 10 जण रत्नागिरी-पंढरपूर सायकलवारी करत आहोत. सायकलने जायचे हे पहिलेच वर्ष आहे. वारीला पाठिंबा देणारे सदस्य आमच्यासोबत हातखंबा, पालीपर्यंत आले. यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. विठुरायाचा गजर करत वारी पूर्ण करू, असे नारायण पाटोळे म्हणाले.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमुळे मला सायकलवारी करण्याची संधी मिळाली. हा नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणावा लागेल. आज रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरातून विठुरायाचे दर्शन घेऊन सायकल वारीला सुरवात केली, असे अमित पोटफोडे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List