Air India ला अहमदाबादमधील विमान अपघाताचा मोठा फटका, बुकिंगमध्ये 30 ते 35 टक्के घट
गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघात घडला. या अपघातानंतर आता देशभरातील प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 12 जूनला झालेल्या या अपघातानंतर आता एअर इंडियाच्या मागे चांगलेच शुक्लकाष्ठ लागले आहे. एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. या अपघातात विमानात असलेल्या प्रवाशांसह इतरांनाही प्राण गमवावे लागले. झालेल्या या अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानाच्या बुकिंगमध्ये 30 ते 35 टक्क्यांनी घट झाली आहे.
अपघातानंतर एअर इंडियाच्या बुकिंगमध्ये झालेली ही घट विचारात घेण्यासारखी आहे. ही घट जवळपास 30 ते 35 टक्क्यांनी झालेली आहे. अनेक अहवालांमधून असे दिसून आले आहे की, बहुसंख्य प्रवाशांनी त्यांचे बुकिंग वेगाने रद्द केले आहे. अनेकांनी परताव्याची चिंता न करता त्यांची आंतरराष्ट्रीय तिकिटेही रद्द केली आहेत.
ब्लू स्टार एअर ट्रॅव्हल सर्व्हिसेस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे मालक माधव ओझा यांनी बुकिंगमध्ये घट झालेली असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटला सांगितले की, “नव्या बुकिंगमध्ये 30-35% घट झाली आहे. विमान अपघाताव्यतिरिक्त, इस्रायल-इराण युद्धाचाही यावर परिणाम होऊ शकतो.” ट्रॅव्हल एजन्सींच्या अहवालानुसार, 12 जूनपासून एअर इंडियाच्या 20 टक्क्यांहून अधिक बुकिंग रद्द करण्यात आल्या आहेत.
तज्ञांचे म्हणणे आहे की बुकिंग कमी होण्याचे सर्वात मोठे कारण लोकांच्या मनात असलेली भीती आहे. मानसशास्त्रीय तज्ज्ञ एमडी हरीश खत्री यांच्या मते, या अपघाताचा लोकांवर मानसिक परिणाम झाला आहे. ते म्हणाले, “प्रवासाच्या संख्येत मोठी घट झालेली नसली तरी प्रवाशांना एअर इंडियाची आता भीती वाटत आहे.
दरम्यान, गेल्या 48 तासांत एअर इंडियाने 9 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये 4 आंतरराष्ट्रीय उड्डाणे समाविष्ट आहेत. माहितीनुसार, विमानांची तांत्रिक तपासणी, खराब हवामान आणि हवाई निर्बंध लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List