विमान पाडून टाकेन! Air India च्या विमानात महिला डॉक्टरचा गोंधळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होत आहे. त्यात इतर एअर लाईन्सपेक्षा एअर इंडियाला त्याचा अधिक फटका बसला आहे. एअर इंडियाची प्रवासी संख्या 30 टक्क्यांनी घटली आहे. अशातच एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका महिलेने विमानच पाडण्याची धमकी दिली. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला.
बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एअर इंडियाचे विमान उड्डाण करणार होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास विमान उड्डाण करण्याच्या काही मिनिटांपूर्वी ही घटना घडली.
नेमकं काय घडल?
हिरल मोहनभाई (36) असे या महिलेचे नाव असून त्या पेशाने डॉक्टर आहेत. हिरल यांचा सीट नंबर 20F होता. मात्र त्यांनी त्यांचे सामान पहिल्या रांगेतच ठेवले होते. त्यामुळे केबिन क्रूने त्यांना त्यांचे सामान स्वत:च्या सीटजवळील ओव्हरहेड डब्यात ठेवण्यास सांगितले. परंतु हिरल यांनी नकार दिला. यानंतर हिरल यांनी केबिन क्रूला त्यांची बॅग सीटवर ठेवण्याची मागणी केली.
दरम्यान, केबिन क्रू आणि पायलटसह सगळ्यांनी त्यांना विनंती केली. पण हिरल यांनी त्यांची बॅग तिथून काढण्यास नकार दिला आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. यावेळी अनेक सहप्रवाशांनी हिरल मोहनभाईंना समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्यांच्यावरही ओरडण्यास सुरुवात केली. आणि विमान पाडून टाकेन अशी धमकी दिली. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला.
हिरल यांनी धमकी दिल्यानंतर पायलट आणि क्रू मेंबर्सनी सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर महिलेला विमानातून खाली उतरवण्यात आले आणि पोलिसांना याबाबत तक्रार केली. दरम्यान, पोलीस हिरल यांची चौकशी करत असताना त्यांनी पोलिसांवरही अरेरावी केली. त्यामुळे बंगळुरू पोलिसांनी तातडीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करून हिरल यांना ताब्यात घेतले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List