Crime news – वांबोरी परिसरात रात्रीत तीन घरफोड्या, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
एकाच रात्रीत चोरट्यांनी तीन घरे फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना तालुक्यातील वांबोरी येथे घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
वांबोरीपासून एक किलोमीटर अंतरावरील सुभाषनगर परिसरात गुरुवारी पहाटे चोरीच्या घटना घडल्या. समर्थनगर येथील रहिवाशी शिवाजी खरमाळे हे कुटुंबीयांसह घरात झोपले असता, तीन चोरट्यांनी घरात प्रवेश करून सामानाची उचकापाचक सुरू केली. त्यावेळी आवाज झाल्याने खरमाळे कुटुंबीय जागे झाले. शिवाजी खरमाळे यांनी चोरट्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्यांच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तू मारल्याने ते चक्कर येऊन खाली पडले, तर त्यांच्या पत्नी मुक्ताबाई खरमाळे यांच्या कानातील सोन्याचे झुबे चोरटे ओरबडत असताना त्यांच्या एका कानाची पाळी तुटल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी वांबोरी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दुसऱ्या घटनेत सागर कवाणे यांचे घर फोडून दहा हजारांची रोकड व दीड तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. तिसऱ्या घटनेत अमोल गडाख यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले, तर गडाख बाहेरगावी असल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला, हे समजू शकले नाही.
माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक समाधान फडोळ, हेडकॉन्स्टेबल वाल्मीक पारधी, आजिनाथ पाखरे, राहुल यादव, प्रमोद ढाकणे हे श्वान पथक व ठसेतज्ज्ञांसह घटनास्थळी दाखल झाले. श्वानाने परिसरात माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला.
” वांबोरी परिसरात घडणाऱ्या चोऱ्या, घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने सीसीटीव्ही यंत्रणा बंद अवस्थेत धूळखात पडून आहे.”
– राजेंद्र पटारे, माजी उपसरपंच, वांबोरी.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List