चला, उठा… सज्ज व्हा! लढायचं आणि जिंकायचंच!!आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडणार
स्थळ – षण्मुखानंद सभागृह
वेळ – सायंकाळी 5 वाजता
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन केलेल्या अस्सल शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आज मोठय़ा दिमाखात होणार आहे. निष्ठावंतांचा कुटुंब सोहळाच यानिमित्ताने रंगणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आसूड या मेळाव्यात कडाडणार आहे. मुंबईसह राज्यभरात सध्या पालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाला असून ‘लढायचं आणि जिंकायचंच’ असा वज्रनिर्धार या मेळाव्यातून घुमणार आहे. या मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मराठी माणसाचा स्वाभिमान आणि महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी शिवसेना गेल्या पाच दशकांपेक्षाही अधिक काळ संघर्षरत आहे. भूमिपुत्रांना न्याय मिळवून देतानाच देशातील तमाम हिंदू बांधवांच्या रक्षणासाठीही शिवसेना नेहमीच अग्रेसर राहिली. या वाटचालीत अनेक वादळे आली आणि गेली. त्या वादळांवर स्वार होऊन शिवसेनेचा भगवा झेंडा आजही डौलाने फडकत आहे. महाराष्ट्र धर्मासाठी संघर्षाची मशाल आजही धगधगत आहे. याच तेजस्वी वाटचालीचा दिमाखदार सोहळा उद्या षण्मुखानंद सभागृहात होणार आहे.
– धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईची लूट सुरू आहे. मोदींचे मित्र अदानींवर भूखंड आणि सवलतींची खैरात केली जात आहे. त्यासोबतच मुंबई आपल्या ताब्यात घेण्यासाठी मोदी-शहा टपून बसले आहेत. हा सगळा डाव हाणून पाडण्यासाठी, मुंबई वाचवण्यासाठी, मराठी अस्मिता टिकवण्यासाठी येणारी महापालिका निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार असून उद्धव ठाकरे यावर कोणती भूमिका मांडतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
– हा निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा आहे. या सोहळय़ाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
– देश अस्थिर आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे. गुन्हेगारी माजली आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. यावरूनही उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.
– मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. ही मिनी विधानसभा निवडणूकच असेल. त्या पार्श्वभूमीवर उद्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे तमाम शिवसैनिकांना कोणता संदेश आणि कानमंत्र देतात याची उत्सुकता आहे.
असे आहे नियोजन…
– षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी 5 वाजता हा वर्धापन दिन सोहळा सुरू होणार आहे. शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला आघाडी तसेच युवासेना आणि सर्व संलग्न संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
– या सोहळय़ाच्या प्रवेशिका मुंबईतील विभागप्रमुखांमार्फत वितरीत करण्यात येत असून ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आसन व्यवस्था असणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List