आता प्रत्येक एटीएममधून निघणार 100-200 च्या नोटा! बँकांनी नोटांचा पुरवठा वाढवला
प्रत्येक बँकेने आपल्या एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा अवश्य उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश काही दिवसांपूर्वी आरबीआयने दिलेले होते. त्यादृष्टीने बँकांनी चांगली प्रगती केल्याचे दिसून आहे. सुमारे 73 टक्के एटीएम असे तयार झालेत, ज्यामध्ये कमीत कमी एका कॅसेटमधून 100 ते 200 रुपयांच्या नोटा येतात. डिसेंबर 2024 मध्ये ही संख्या 65 टक्के होती. त्यात आता सुधार होतोय. एटीएममधून पैसे काढायला आपण एटीएम सेंटरमध्ये जातो, तेव्हा अधिकतर 500 रुपयांच्या नोटा हाती येतात. 500 रुपये सुट्टे करताना सामान्यांना अडचणी येतात. खास करून ग्रामीण आणि छोटय़ा शहरात राहणाऱयांना सुट्टे मिळत नाहीत. अशा वेळी आरबीआयने सर्व बँकांना दिलेला नवा आदेश लोकांना फायद्याचा ठरणार आहे.
सीएमएस इन्फो सिस्टिम्स देशातील अडीच लाखांपैकी 73 हजार एटीएमचे व्यवस्थापन बघते. या कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता लहान मूल्याच्या नोटांच्या उपलब्धतेत बराच सुधार दिसून येतोय. देशातील 60 टक्के लोक आजही रोखीचा व्यवहार करतात. जर एटीएममधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटा मिळू लागल्या, तर लोकांना आपल्या गरजांप्रमाणे पैसे काढणे सोपे होईल.
बँकांमधील एफडीची क्रेझ घटली
बँकांमधील एफडीची क्रेझ कमी होत आहे. लोक बँकांमध्ये पैसे जमा करण्याऐवजी म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारासारख्या अन्य ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. कारण तिथे बँकांपेक्षा अधिक फायदा होत आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, बँकांमध्ये एफडी, आरडी मधील हिस्सेदारी 2020 च्या अखेरपर्यंत 50.54 टक्के होती. 2025 मध्ये ती कमी होऊन 45.77 टक्के झाली. याचा अर्थ लोक बँकेत पहिल्यासारखे पैसे ठेवत नाहीत.
आरबीआयने एप्रिल 2025 मध्ये एक पत्रक काढले आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व बँकांच्या कमीत कमी 75 टक्के एटीएममध्ये 100 ते 200 रुपयांच्या नोटा उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगितले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List