Air India Plane Crash- दुर्घटनाग्रस्त विमानात नव्हते, ना होस्टेलमध्ये.. मग महेश जिरावाला कुठे बेपत्ता झाले?
अहमदाबाद विमान अपघाताला चार दिवस उलटले आहेत. या अपघाताने अनेकांना असे दुःख दिले आहे, जे कधीही विसरण्याजोगे आहे. दरम्यान अहमदाबादच्या एका चित्रपट निर्मात्याच्या बेपत्ता होण्याने चिंता निर्माण केली आहे. महेश जिरावाला म्हणून प्रसिद्ध असलेले चित्रपट निर्माते महेश कलावाडिया गुरुवारी दुपारपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या पत्नी हेतल यांच्या मते, महेश त्या दिवशी लॉ गार्डन परिसरात कोणालातरी भेटायला गेले होते. त्यांच्या फोनचे शेवटचे लोकेशन संपूर्ण शहराला हादरवून टाकणाऱ्या एअर इंडियाच्या भयानक विमान अपघाताच्या ठिकाणापासून फक्त 700 मीटर अंतरावर होते.
गुरुवारी दुपारी 1.39 वाजता, सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच एअर इंडियाचे विमान एआय-171 मेघनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात कोसळले. या भयानक अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. विमान ज्याठिकाणी कोसळले तिथे तब्बल 29 जणांना आपले प्राण गमवावे लागले.
महेश जिरावाला यांच्या पत्नी हेतल यांच्या म्हणण्यानुसार, ‘महेशने मला दुपारी 1.14 वाजता फोन केला आणि सांगितले की त्याची बैठक संपली आहे आणि तो घरी परतत आहे. पण जेव्हा तो आला नाही तेव्हा मी त्याच्या फोनवर कॉल केला, जो बंद होता.’ पोलिस तपासात असे दिसून आले की महेशचा फोन विमानाने उड्डाण केल्यानंतर फक्त एक मिनिटानंतर 1.40 वाजता बंद होता. त्याची स्कूटर आणि मोबाईल फोन देखील गायब आहे. हेतल म्हणाली, ‘त्याचे शेवटचे ठिकाण दाखवणाऱ्या मार्गावरून तो कधीच घरी आला नाही. हे सर्व खूप असामान्य आहे.’
दुर्घटनेतील अनेक मृतदेह इतके जळाले आहेत आणि खराब झाले आहेत की, त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. प्रशासन डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवत आहे. जमिनीवर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महेशचाही समावेश आहे का हे शोधण्यासाठी त्याच्या कुटुंबाने डीएनए नमुने देखील सादर केले आहेत. रविवारी रुग्णालयाकडून डीएनए मॅचिंगद्वारे 47 चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवण्यात आली आहे आणि 24 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले आहेत.
२७० लोकांचा जीव घेणारा हा अपघात अहमदाबादच्या इतिहासातील सर्वात दुःखद घटनांपैकी एक आहे. महेशच्या बेपत्ता होण्याने या दुर्घटनेत एक नवीन गूढ भर घातली आहे. तो त्या भयानक अपघाताचा बळी होता की, तो नेमका कुठे गायब झाला? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List