प्रभागरचनेसाठी पुणे महापालिका घेणार ‘गुगल अर्थ’चा आधार
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने चार सदस्यीय प्रभागरचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी 20 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार गुगल मॅप आणि गुगल अर्थचा शंभर टक्के वापर करून महापालिकेची पारदर्शकपणे प्रभागरचना तयार केली जाईल, असा दावा महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख उपायुक्त प्रसाद काटकर यांनी केला.
नव्याने प्रभागरचना तयार करण्याचे राज्य सरकारने आदेश काढताच, पुणे महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार ही निवडणूक 2011 च्या जनगणनेनुसार होणार आहे. यंदा महापालिकेचे 165 सदस्य असतील. प्रभागरचनेचे प्रारूप तयार केल्यानंतरच प्रभागांची संख्या समजू शकेल. 42 प्रभाग असतील. यापैकी 39 प्रभाग हे चार सदस्यीय असण्याचा अंदाज आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीमध्ये 6 हजार 400 प्रगणक गट आहेत. हे गट न फोडता नगरविकास विभागाने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे, नाले, ओढे, नदी, डोंगर या नैसर्गिक सीमारेषांसोबतच मोठे रस्ते, याच सीमारेषा ग्राह्य धरून गुगल मॅप आणि गुगल अर्थचा वापर करून प्रभागांच्या सीमारेषा निश्चित केल्या जातील. समाविष्ट गावांच्या प्रगणक गटांची यादी उपलब्ध झाल्यानंतर या यादीसह शहराच्या हद्दीतील प्रगणक गटांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार असल्याचे काटकर यांनी सांगितले.
प्रारूप प्रभागरचना पालिका आयुक्तांनी तयार करून ती निवडणूक आयोगाच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभागरचनेचे काम मार्गी लावण्यासाठी पालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशाने प्रभागरचना करण्याच्या कामासाठी 20 कर्मचाऱ्यांची कमिटी नेमण्यात आली आहे. यात शहराची माहिती असणारे अभियंते, टंकलेखक, लिपिक, आयटीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. निवडणुकीसाठी पालिकेच्या सावरकर भवन येथे मुख्य कार्यालय असणार असून, येथून सर्व कामे चालणार आहेत.
प्रसाद काटकर, निवडणूक विभागाचे प्रमुख उपायुक्त, पुणे महापालिका.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल?
प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक
महापालिकेत 31 लाख लोकसंख्येला 162 नगरसेवक आणि त्या पुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येला एका नगरसेवकाची संख्या वाढवली जाते. 2011 मध्ये पुणे शहराची लोकसंख्या 31 लाख 32 हजार 143 होती. नवीन 11 गावांची लोकसंख्या सुमारे दीड लाख आणि त्यानंतर नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांची लोकसंख्या अडीच लाखांच्या आसपास होती. ही एकत्रित लोकसंख्या सुमारे 35 लाख 50 हजारांच्या जवळपास जाते. त्यामुळे 30 लाखांनंतर प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक असणार आहे.
पुणे महापालिकेची 2017 ची परिस्थिती
लोकसंख्या – 31 लाख 32 हजार 143
मतदार संख्या 26 लाख 34 हजार 800
सदस्य संख्या – 162, अकरा गावे समाविष्ट झाल्यानंतर 2 सदस्यांची भर पडून 164 सदस्य.
प्रभागसंख्या चार सदस्यीय 39 व त्रिसदस्यीय 2 प्रभाग. समाविष्ट 11 गावांचा लोकसंख्येनुसार दोन सदस्यीय एक प्रभाग.
मतदान केंद्रे – 343
ईव्हीएमची संख्या – 3700
खर्च – 20 कोटी 67 लाख रुपये
आकडेवारी काय सांगते?
महापालिकेची 2011 नुसार लोकसंख्या – 34 लाख 81 हजार 359 अंदाजे मतदार संख्या 45 लाख.
अनुसूचित जातीचे मतदार – 4 लाख 68 हजार 433
अनुसूचित जमातीचे मतदार – 40 हजार 687 एका
प्रभागाची लोखसंख्या – सरासरी 84 हजार. कमीत कमी ७५ हजार, तर जास्तीत जास्त ९२ हजार.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List