…तेव्हा तुमचा पक्ष शिल्लक राहील काय? संजय राऊत यांचा भाजपला इशारा
इंदापूरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सभेला संबोधित करत भाजपचा, मिंध्याचा आणि अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. चार महिन्यांनी महाराष्ट्रात फडणवीस आणि देशात मोदी नसतील, ईडी, सीबीआय यंत्रणा आमच्या हातात असतील, त्यावेळी तुमचा पक्ष शिल्लक राहील काय, असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपला दिला. तसेच बारामतीत धमक्या देण्याचे प्रकार सुरू आहेत. आपण बारामतीचा गुजरात होऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी ठणकावले. तसेच कोही लोक गेल्यामुळे महाविकास आघाडीला काहीही फरक पडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोक उन्हात बसलेली असतील, तेव्हा त्यांचा अंत पाहू नका, असे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितले आहे. मात्र, आपण इथे एका विचाराने एकत्र आलो आहोत. पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. माणसाला पराभवाची भीती वाटायला लागली, लोकं आपल्याला स्वीकारणार नाही, अशी भीती वाटली की मोदींचा मार्ग सुरू होतो. धमक्या द्यायच्या ,लोकांना भीती दाखवायचीस पोलिसांच्या वापर करायच्या. आम्ही धमक्या देतोही आणि घेतोही, असेही ते म्हणाले.
धमक्या देण्याचे प्रकार सुरू आहेत, तो डरपोकपणा आहे. आवाज बदलून धमक्या देणाऱ्यांची महाराष्ट्राला भीती नाही. ते बारमतीत धमक्या देतील पण त्यांना मुंबई, ठाण्यात यायचे आहे, तो रस्ता आमचाच आहे. धमक्या कोणाला देतायेत, शरद पवार साहेबांच्या माणसांना की शिवसैनिकांना, अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. ही मर्दांची सभा आहे. नामर्द, डरपोक होते,ते पळून गेले, असे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र यांना अडवून प्रचार करू नका, असे सांगतात. त्यांनी त्यांचा प्रचार करावा आणि बारामतीत निवडून यावे. ही लढाई बारामतीची नाही, ही महाराष्ट्राची लढाई आहे. महाराष्ट्राच्या, अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई आहे. बारामतीत महाविकास आघाडीला प्रचाराची गरज नाही. सुप्रिया सुळे, शरद पवार येथे आहेत. मात्र, त्यांची दादागिरी, दडपशाही, धमक्या याला उत्तर देण्यासाठी आलो आहोत. आपण बारामतीचे गुजरात होऊ देणार नाही. असा प्रयत्न कोणी करत असेल तर शिवसेनेचा भगवा जनतेसोबत ठामपणे उभा राहील, असे ते म्हणाले.
आपले गुजरातशी भांडण नाही, गुजराती व्यापारी, गुजराती जनता आम्ही एकत्र मुंबईत, महाराष्ट्रात, देशात काम करतो. मात्र, सध्या जी वृत्ती वाढत आहे, त्याला पायबंद घालण्याची गरज आहे. राजकारणातला माणूस विकासावर बोलतो, विकासावर मते मागतो. आपण केलेल्या कामांवर मते मागतो. धमक्या देत मते मागतात, त्यांनी विकास केला नाही, हे स्पष्ट आहे. त्यांच्यावर जनतेला धमक्या देण्याची वेळ का येते, कारण जनता त्यांच्यासोबत नाहीये, असे त्यांनी सांगितले.
मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो, असे देवेंद्र फडणवीस नुकतेच म्हणाले. राजकारणातला माणीस सांगतो, मी रस्ते केले, इमारती बांधल्या, रुग्णालये उभारली, जनतेला शिक्षण दिले, आरोग्याच्या सोयी दिल्या आणि ते सांगतात, मी दोन पक्ष फोडून आलो. चार महिन्यांनी देशातील सरकार बदलणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही आणि देशात मोदी नसेल. सत्ता आमच्याकडे असेल. तुम्ही ईडी, सीबीआयच्या दहशतीवर पक्ष फोडले. उद्या ही यंत्रणा आमच्याकडे असेल. तेव्हा तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का बघा, असा इशाराही त्यांनी दिला.
हर्षवर्धन पाटील यांना गेल्या काही महिन्यांपासून शांत झोप लागली असेल असे वाटत नाही. त्यांना स्वाभिमान, मराठी अस्मिता असेल तर मराठी माणसाला शांत झोप येऊ शकत नाही. महाराष्ट्रासाठी आणि मराठी अस्मितेसाठी त्यांनी आता मैदानात उतरावे. त्यांची अस्वस्थता आपल्याला जाणवत आहे. भाजप कोणलाही शांत राहू देत. त्यांच्या जीवनातील शांतता भाजपने संपवून टाकली आहे. शांत झोप फक्त दिल्लीतील दोघांनाच लागते. येणाऱ्या काळात त्यांना शांत झोप घेण्यासाठी आपण गुजरातमध्ये पाठवू किंवा केजरीवाल आणि सोरेन यांना जिथे ठेवले, तिथे पाठवू. तिथे त्यांना शांत झोप लागेल, याची गॅरंटी आम्ही देतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, भाव फक्त गद्दार आमदार, खासदारांना आहे. मोदी यांनी 2014 मध्ये सांगितल होते की , शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. असे त्यांचे अच्छे दिन आम्हाला नकोत. 2014 पुर्वीचे आमचे अच्छे दिन आम्हाला परत द्या. त्यासाठी आपली लढाई आहे. राज्यात महाविकास आघाडी मजबुतीने पुढे जात आहे. काहीजण गेल्यामुळे आमचा प्रवास थांबला असे काही जणांना वाटत असेल. मात्र, अजित पवार गेल्यामुळे झाडाचे पानही हलले नाही, एकनाथ शिंदे गेल्यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली. अशोक चव्हाण गेल्यामुळे आदर्श टॉवर खाली आला नाही. तो तिथेच उभा आहे.त्यांच्यामुळे काहीही फरक पडलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर झाले. नरेंद्र मोदी यांनी तिथे प्राणप्रतिष्ठा केली. मात्र, श्रीराम त्यांना मते मिळवू देणार नाही, अशा सध्या परिस्थिती आहे. या विश्वात रामकृष्णही आले गेले, तयाविना जग ना अडले. कुणी सदोदित सुतक धरले, मग काय अटकले मजशिवाय, अशा कवितेच्या ओळी म्हणत या अजित पवारांना सांगव्यात, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे काहीही अडले नाही. मात्र, महाविकास आघाडी सोडून गेलेल्यांच्या जीवनात जनता अडथळे आणल्याशिवाय राहणार नाही. देशाचा कृषिमंत्री कोण ते देशाला माहिती नाही. शरद पवार कृषिमंत्री असताना 71 हजार कोटींची कर्ज माफ केले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रई असताना 2 लाखांची कर्जमाफी केली होती. महाराष्ट्राची ओळख बारामती आणि शरद पवार यांच्यामुळे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि बारामतीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणारच, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List