जगाला आणखी विक्षिप्त आणि संतप्त लोकांची गरज; ग्रेटा थनबर्ग यांचा ट्रम्प यांच्यावर पलटवार
रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अपयश आले आहे. तसेच इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्षात त्यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तसेच ट्रम्प यांच्या धोरणांचा अमेरिकेतही विरोध होत आहे. आता ट्रम्प यांच्यावर जागितक हवामान बदलाबाबत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी हल्ला चढवला आहे. गाझाला मगत करण्यासाठी थनबर्ग यांनी राबवलेल्या मोहिमेची ट्रम्प यांनी खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता थनबर्ग यांनी ट्रम्प यांच्यावर जबरदस्त पलटवार केला आहे.
ग्रेटा थनबर्ग यांच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली होती. त्या टीकेला थनबर्ग यांनी उपहासात्मक शब्दांत चोख प्रत्युत्तर दिले आहे. स्वीडिश हवामान बदल कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपहासात्मक टीका करताना म्हटले आहे की, जगाला आणखी काही विक्षिप्त, रागीट आणि संतप्त लोकांची गरज आहे. थनबर्ग यांनी गाझासाठी राबवत मोहीम करण्याआधी राग व्यवस्थापनाचे धडे घ्यावे, असा खोटक सल्ला ट्रम्प यांनी दिला होती. त्यावर थनबर्ग यांनी हे उत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी गाझाला मदत पोहोचवण्याच्या थनबर्ग यांच्या प्रयत्नाचा निषेध केला होता. त्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
थनबर्ग यांच्याबाबत ट्रम्प म्हणाले होते, मला वाटते की थनबर्ग यांना राग व्यवस्थापन वर्गात जावे लागेल. तिच्यासाठी ही माझी प्राथमिक शिफारस आहे. फ्रीडम फ्लोटिला यांनी 1 जून रोजी इटलीहून गाझा येथे मदत पोहोचवण्यासाठी एक मोहीम आयोजित केली होती. हमासविरुद्ध इस्रायलच्या युद्धामुळे गाझा उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहे. त्यासाठी गाझाला मदतसामग्री पोहचवण्यासाठीची ही मोहीम होती. मात्र, इस्रायलच्या सुरक्षा दलांनी तिच्या बोटीला अडवले. त्यानंतर तिने इस्रायलवर आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत आमचे अपहरण केल्याचा दावा थनबर्ग यांनी केला होता. हे आणखी एक जाणूनबुजून अधिकारांचे उल्लंघन आहे जे इस्रायल करत असलेल्या असंख्य इतर उल्लंघनांच्या यादीत जोडले गेले आहे, असे थनबर्ग यां सांगितले.
ट्रम्प यांनी थनबर्ग यांच्या मदत मोहिमेवर टीका केली होती आणि तिला राग व्यवस्थापनाचे धडे घेण्याचा सल्ला दिला होता. जगाला सध्या आणखी विक्षिप्त आणि संतप्त लोकांची गरज आहे. विशेषतः सध्या जे काही चालू आहे. आपल्याला त्याचीच सर्वात जास्त गरज आहे, अशा शब्दांत थनबर्ग यांनी ट्रम्प यांच्यावर हल्ला चढवला. याआधीही अनेकदा थनबर्ग आणि ट्रम्प यांच्यात शाब्दीक वादावादी झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List